मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपला वजन वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी, नामवंत व्यक्तींचा पक्षात प्रवेश हाही त्याचाच एक भाग आहे. प्रसिद्ध मराठी लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री सुरेखा कुडची हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात गुरुवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेखा कुडचीचे पक्षात स्वागत केले. तसेच, तिच्यावर विशेष जबाबदारीही देण्यात आली आहे. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर, ज्येष्ठ अभिनेत्री आणि पुणे जिल्हाध्यक्षा प्रिया बेर्डे, ख्यातनाम गायिका आणि विदर्भ विभागाच्या अध्यक्षा वैशाली माडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
सुरेखा कुडचीने विविध चित्रपट आणि मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. कुडचीने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसह काही हिंदी चित्रपटांतही अभिनय केला आहे. मात्र, लावणी नृत्यकलेतून त्यांनी महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची पावलं थरकायला लावली आहेत. आता, राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मजबुतीसाठी ती काम करणार आहे.