अभिनेत्री पल्लवी जोशी कोविड पीडित मुलांना दत्तक घेणार !
मुंबई : अभिनेत्री पल्लवी जोशी आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी कोव्हिड-१९ साथीच्या आजाराने पीडित झालेल्या मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी हातमिळवणी केली आहे. कोव्हिड-१९ मुळे भारत इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर आणि अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. अशा परिस्थितीत मदत कार्यासाठी सिनेसृष्टीतील हे जोडपं पुढाकार घेत आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं कोव्हिड-१९ मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी, तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करत आहेत. हे जोडपं ‘आय एम बुद्धा फाउंडेशन’ चालवित आहेत, ज्याद्वारे ते चित्रपट क्षेत्रातील, कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करत आहेत. या संदर्भात पल्लवी जोशी म्हणतात की, या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक त्रास सहन करत आहेत.
या कामासाठी या जोडप्याने ”नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स” (एनसीपीसीआर) या महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोगासोबत करार केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणतात की, मुलांसाठी मानसशास्त्रज्ञांकडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रं घेतली जातात. आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे कुटुंब विलग्नवासात आहेत. कारण कधी कधी भावनात्मक उथळपणामधून जात असलेल्या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात. अशा मुलांची चिंता आणि राग अनुभवण्याची सुद्धा एक पद्धत असते, कारण त्यांचा सांभाळ नातेवाईक किंवा जवळचे परिजन करत असतात.
कोव्हिड-१९ सर्व देशभर पसरला असताना या वेळी एक छोटासा पुढाकार हजारो लोकांचा जीव वाचवू शकेल आणि हे जोडपे ते कार्य करत आहेत. पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटुंबाच्या मदतीवर भर देत आहेत.