एसटीच्या आणखी २३८ कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई
मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरु आहेत. संप मागे घ्या, असे आवाहन करुनही कर्मचारी ऐकत नसल्याने एसटी महामंडळाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आणखी २३८ एसटी कर्मचा-यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी होते. तर संपात सहभागी २९७ कर्मचाऱ्यांवर काल निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडाळाच्या निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ७७६ वर पोहचली आहे.
मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांचं जागर गोंधळ आंदोलन सुरु आहे. मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच रोखले गेले आहे. दरम्यान, एसटीतील २३८ कर्मचार्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचार्यांवरही सेवा समाप्तीची कारवाई सुरू राहणार आहे. मात्र कर्मचारी आंदोलनावर ठाम आहे.
राज्यातून आझाद मैदानातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कर्मचारी दाखल होत आहेत. त्यांना अडवलं जातंय. मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या मनमाड आगारातील २१ एसटी कर्मचाऱ्यांना मनमाड पोलिसांनी अडवून ताब्यात घेतले. जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा पवित्रा या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
मुंबईत आझाद मैदानात आंदोलनासाठी निघालेल्या मनमाडच्या २१ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र काही वेळ ताब्यात ठेवल्यावरनंतर समज देऊन या आंदोलकांना सोडून देण्यात आलं. मनमाडहुन पंचवटी एक्स्प्रेसने हे आंदोलक मुंबईकडे निघाले होते. सकाळीच मनमाड रेल्वे स्थानकातच पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते.
आझाद मैदान इथे येत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पनवेल, कळंबोली, टोल नाके इथे पोलिसांकडून अडवण्यात येत आहे. आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेली ही माहिती दिली. आज अनेक ठिकाणाहून एसटी कर्मचारी आझाद मैदान इथे येत आहेत. गेल्या ११ दिवसांपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.
राज्य शासनाच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी भंडाऱ्यात मुंडन आंदोलन केले. कंत्राटीपद्धतीवरील अनेक एसटी कर्मचा-यांचे निलंबन केले आहे. त्यामुळे या कारवाईला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जोपर्यंत राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांसह कोर्टाने विनंती करुनही अद्याप बहुतांश एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना प्रवास करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्यात. दरम्यान विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या संपात उडी घेत संपकरी कर्मचाऱ्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे या संपाला आता राजकीय वळण मिळाले आहे. अशातच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अन्य राज्यांतील परिवहन मंडळांचा अभ्यास करुन अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचे म्हटववे आहे. मात्र दोन्ही बाजूंनी चर्चा करुन तोडगा निघत नसल्याने आंदोलन मिटण्याचेही नाव घेत नाही.