दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार – प्रशांत किशोर यांची पुन्हा बैठक
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारदिल्लीत पोहोचले आहेत आणि येथे त्यांच्या निवासस्थानी राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांच्याशी त्यांची बैठक सुरू आहे. सध्या राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता, पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची मुंबईत बैठक झाली होती आणि आता पुन्हा थेट दिल्लीतच पवार-किशोर बैठ होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून ना-ना कयास लावले जात आहेत. यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करावी, यातच शिवसेनेला फायदा आहे, असे म्हटले आहे. सरनाईक यांच्या लेटरबॉम्बमुळे अक्षरशः राजकीय धुरळा उठला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत पोहोचले आहेत आणि त्यांनी येथे कदाचित किशोरांपासूनच बैठका घ्यायलाही सुवात केली आहे. यामुळे शरद पवार यांच्या मनात नेमकं चालय तरी काय? यावरच सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याच बरोबर यानंतर आता पवार नेमके कुणा कुणाला भेटतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार सुरक्षित, सुरळित असल्याचे आणि ते पाच वर्षे टिकेल असेल दावे होत असले, तरी या सरकारचे वरून किर्तन आणि आतून गोंधळ सुरू असल्याचे कुणापासूनही लपून राहिलेले नाही. नव्हे, ते प्रताप सरनाईक यांच्या पत्रने चव्हाट्यावरही आले आहे. अलीकडेच महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दिल्लीला गेले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ३० मिनिटे खासगीत भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात बदलाचे संकेत मिळत आहेत. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही, असे म्हणत इंदिरा गांधींच्या आणीबाणी काळात बाळासाहेबांनी जो पाठिंबा दिला होता त्याचा दाखला दिला होता. मात्र, असे असले तरी, भाजपासोबत शिवसेना जाणार की राष्ट्रवादी यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या दिल्ली दौऱ्यात शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होणार का? हेदेखील अद्याप कळलेले नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे.