Top Newsराजकारण

चंद्रपूरसाठी काळा दिवस; ठाकरे सरकारच्या निर्णयावर पद्मश्री बंग दाम्पत्य तीव्र नाराज

चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. गडचिरोली, चंद्रपूर भागात आदिवासींच्या आरोग्यावर काम करणाऱ्या पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांनी हा चंद्रपूरसाठी काळा दिवस असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच हे दारुबंदीचं अपयशी आहे की मंत्री-शासन असा प्रश्नही उपस्थित केलाय. दारूबंदी उठवण्याचा राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आणि दुर्दैवी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

डॉ. अभय बंग म्हणाले, जिल्ह्यातील १ लाख महिलांचे आंदोलन, ५८५ ग्रामपंचायती व जिल्हा परिषदांचा ठराव यामुळे शासनाने ६ वर्षांपूर्वी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्या दारूबंदीची अंमलबजावणी पुरेसी झाली नाही हे अगदी खरं आहे. पण सरकारच्या कोणत्या योजनेची आणि कायद्याची अंमलबजावणी १०० टक्के होते? मग या सर्व योजना-कायदे रद्द करणार का? शासनाला कोरोना नियंत्रण नीट करता येत नाही. म्हणून कोरोना नियंत्रणाचं कामही थांबवणार का?

अंमलबजावणी नीट होत नाही तर नीट करा! त्यासाठीच शासन आहे, मंत्री आहेत. दारूबंदीची अंमलबजावणी शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात चांगली होते, बिहारमध्ये चांगली होते, मग चंद्रपुरात का करता येत नाही? की ती करायचीच नाही? चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याची मागणी स्वत: पालकमंत्र्यांनी घोषित करून मग त्याचे समर्थन करण्यासाठी शासकीय समितीचा फार्स केला. आता शासनाचा निर्णय करवून घेतलाय, असं डॉ. बंग यांनी सांगितलं.

सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी दारुबंदी हटवायची असल्याचाही दावा केला जातो. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मला व्यक्तीशः म्हणाले की सरकार चालवायला, अर्थसंकल्प करायला मला चंद्रपूरच्या दारुच्या कराची गरज नाही. त्यामुळे सरकारच्या या तर्कात अर्थ नाही, असंही डॉ. बंग यांनी नमूद केलं.

चंद्रपूरच्या इतिहासातील अत्यंत काळा दिवस : राणी बंग

डॉ. राणी बंग म्हणाल्या, चंद्रपूरच्या इतिहासातील हा अत्यंत काळा दिवस आहे. पालकमंत्री आपल्या भावी पीढिच्या रक्षणासाठी असतात. मात्र, चंद्रपूरचे पालकमंत्री निवडून आल्यापासून दारुबंदी उठवण्याच्या कार्यक्रमाचा घोषा लावत होते. जणुकाही दारुबंदी उठवण्याच्या एकमेव कामासाठी ते निवडून आले होते. अर्थात त्यांनी त्यांचा शब्द खरा करुन दाखवला आहे. मात्र, मंत्रिमंडळाने हीच तत्परता कोरोनाचं नियंत्रणासाठी खर्ची घातली असती तर अधिक चांगलं झालं असतं.

बंग दाम्पत्याचे सरकारला काही सवाल

– जिल्ह्यातील ४ लाख पुरुष दारू पितील, १५०० कोटी रुपये त्यावर उडवतील. त्यांच्या कुटुंबांचे काय होणार?
– जवळपास ८०,००० व्यसनी निर्माण होतील. त्याला जबाबदार कोण? त्यांची व्यवस्था काय?
– स्त्रियांवर अत्याचार, गुन्हे, बलात्कार, मारपीट हे प्रचंड प्रमाणात वाढतील. त्यासाठी जबाबदार कोण ?
– दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात चंद्रपूरमधील दारू आयात होईल. ती कोण व कशी थांबवणार ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button