जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हा असणाऱ्या जळगावातील राजकीय वातावरण तापलं आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये नळावरच्या भांडणासारखे शाब्दिक युद्ध रंगलंय. गिरीश महाजन यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याची टीका केली होती. या टीकेपासून वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. एकनाथ खडसे यांनी महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. या टीकेला आता गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतायत, अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या टीकेला उत्तर दिलंय. एकनाथ खडसे यांचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळताय, असा पलटवार गिरीश महाजन यांनी केला. खोटेनाटे गुन्हे दाखल करायचे, पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचे उद्योग ते करताय, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय.
गिरीश महाजन यांनी काही वृत्तपत्रांशी फोनवर बोलताना खडसे यांच्यावर मोक्का लागण्याच्या भीतीनं कोरोना झाल्याच्या वक्तव्यावर टीका करताना खडसे यांना ठाण्याला दाखवायला हवे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांनी काल उत्तर दिले आहे. आपल्याला ठाण्याला हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज नाही, मात्र गिरीश महाजन यांना पुण्याला बुधवार पेठेत दाखवायला हवे, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं होतं.
गिरीश महाजन यांनी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ८ जानेवारीपासून स्वत:ला घरीच क्वारंटाईन करुन घेतलं आहे. ते घरीच उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
खडसे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. मी चाळीस वर्षे तुमच्याबरोबर होतो तेव्हा चांगला होतो. आता एका वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की तुम्ही ईडी लावता आणि तुम्ही तारीख पे तारीख सुरु असल्याचं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपवर व देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता जहरी टीका केलीय. रावेर येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात भाषणात नाव न घेता त्यांनी फडणवीसांना टोले मारले
भाजपमध्ये काम करत असताना पक्षाच्या विस्तारासाठी गाव पातळीवर काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केलं हे तुम्ही पाहिलं आहे. अनेक लोक घडवले, पक्षाच्या माध्यमातून मोठे केले. नाथाभाऊच्या आशीर्वादनं मोठे झाले. कोणी पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य केले, जिल्हा परिषद अध्यक्ष केले. या ठिकाणी मेहनतीनं कष्टानं माणसं उभं केली आणि घडवली. ४० वर्षे रक्ताचं पाणी करत पक्षासाठी फिरत होते. ३० वर्षापूर्वी एकटा आमदार होतो. पुढं पक्ष वाढत गेला. गावागावामध्ये पक्ष पोहोचला, साऱ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची मेहनत आम्ही केली.
अलीकडचे राजकारण कशाप्रकारे चालते हे तुम्ही पाहत आहे. कोणाच्या मागे कशा ईडीच्या चौकशा लावल्या जाता ते तुम्ही पाहताय. ४० वर्षांमध्ये मी तुमच्या सोबत चांगला होतो. एक वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलो की मागं ईडी लावता. तारीख पे तारीख सुरु करता. ज्या माणसाच्या बळावर तुम्ही इतके दिवस उभे राहीले आणि आता त्याचा अपमान करता. त्याचे फळे तुम्हाला भोगावे लागतील जनता तुम्हाला येणाऱ्या कालखंडात माफ करणार नाही, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. एकनाथ खडसे यांनी यावेळी बोलताना ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत अनेक लोक उभी केल्याचं सांगितलं.