मुंबई : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून मदत द्यायला सांगितली असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असं अजित पवार म्हणाले.
वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.