मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित खळबळजनक दावा केला आहे. फडणवीसांची जवळची व्यक्ती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटत आहे. हा व्यक्ती निरज गुंडे आहे. हा मागील फडणवीस सरकारचा दलाल आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खळबळजनक दावे केले. निरज गुंडे या व्यक्तीने नवाब मलिक यांच्या मुलाच्या जमीन खरेदी संदर्भात ट्विट केलं होतं. यावर नवाब मलिक यांनी बोलताना खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. निरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे. हा दलाल माझ्यावर आरोप करत आहे. ज्याच्या घरी माजी मुख्यमंत्री येऊन बसत होते. त्या दलालाला मुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश होता. तो दलाल वर्षावर कायम फिरत असायचा, सगळ्या विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात जायचा. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. अशी कोणती भीती या नेत्यांना वाटत आहे. त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही सर्व प्रकरणं विधानसभेच्या पटलावर आणणार. असा खुलासा करणार की भाजप महाराष्ट्रात तोंड दाखवायला राहणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले.
या चेंबूरच्या गृहस्थाच्या माध्यमातून काय चाललंय? हा का जातो आणि कशासाठी याची माहिती आतले अधिकारी सांगत आहेत. जर समीर वानखेडेवर भाजपचे प्रेम असेल तर त्याला उघडपणे भेटा ना दूताच्या माध्यमातून कशाला भेटता अशी विचारणा करतानाच संपूर्ण भाजप आणि त्यांच्या महाराष्ट्रातील नेत्यांचे काहीतरी गौडबंगाल सुरू आहे. धुगधुगी त्यांच्या मनात सुरू आहे असंही नवाब मलिक म्हणाले.
ड्रग्जमुळे मलिक कोट्यवधींचे मालक; वानखेडेंच्या वडिलांचा आरोप
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराबाबत लावल्या आरोपासंबंधित आज क्रांती रेडकर आणि त्यांचे सासरे ज्ञानदेव वानखेडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यादरम्यान वानखेडेंचे कुटुंबिय आणि रामदास आठवले यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन ज्ञानदेव वानखेडे यांनी अनेक कागदपत्र दाखवली. ‘मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी महार जातीतील आहे,’ असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी निशाणा साधला आणि आरोप केले.
मंत्री होताना संविधानाची शपथ घेतली जाते. यावेळेस मंत्री व्यक्तिगत बदनामी करणार नाहीत, अशी शपथ घेतात. मात्र नवाब मलिक संविधानाचा अपमान करत आहेत. आमच्याकडे जन्मल्यापासूनचे शाळेतल्या दाखल्यापर्यंतचे सर्व कागदपत्रे आहेत. मी कधीही धर्मांतर केलं नसून मी महार जातीतील आहे. १९७८ साली मी मुस्लिम महिलेसोबत लग्न केले होते आणि हे लग्न हिंदू पद्धतीने झाले होते. समीर आणि मी कधीही धर्मांतर केलं नाही. मी जय भीम वाला आहे. मी आंबेडकरवादी आहे, याचा मला अभिमान आहे. आमच्यावरील वैयक्तिक आरोप थांबवे. हा प्रश्न फक्त ड्रग्जचा आहे. मात्र तुमच्या जावयाला अटक केल्यामुळे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना बदनाम करू नका. काय असेल तर तुम्ही कोर्टात जावा, असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.
पुढे समीर वानखेडेंचे वडील म्हणाले की, नवाब मलिक भंगारवाले असून ते मुंबईत कधी आले, गाव कोणते, जन्म कुठला, त्यांचं पहिलं नाव काय याचा शोध घ्यावा. मला मलिकांच्या नावात शंका वाटतेय. कारण एका भंगारवाल्याचे नाव नवाब कसे काय असू शकते. याची माहिती काढावी. तसेच १०० रुपयांपासून नट बोल्ट विकणारा माणसाकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी कशी काय? याची चौकशी सरकार आणि माध्यमांद्वारे करावी. जर आता माझ्या मुलासह कुटुंबियांच्या पाठीमागे लागलात तर मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकून तुमचीही घरची सर्व परिस्थिती समोर आणू शकतो. मलिकांनी जावई आणि मुलीकडे लक्ष देऊन संस्कार करावे. याच्या पुढे काहीही काढू नका.
तसेच ड्रग्ज प्रकरणात जावई आहे, म्हणजे मलिकही असण्याची शक्यता आहे. १०० रुपये कमावणारा भंगारवाला इतक्या कोटींची प्रॉपर्टी ड्रग्जमुळेच कमवू शकतो, बाकी कशातून मिळवू शकत नाही. मलिकांनी ड्रग्ज विकून प्रॉपर्टी मिळवली असावी. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात मलिक सहभागी आहेत की नाही? याचा तपास झाला पाहिजे, असे ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.
वानखेडेंचे वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? क्रांती रेडकर संतप्त
पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर प्रश्नोत्तरावेळी चांगल्याच भडकल्या. कोणाचा नवरा कोण आहे याविषयी नवाब मलिकांना काय करायचे आहे. समीर वानखेडे यांचे वयक्तिक आयुष्य आणि ड्रग्ज केसचा काय संबंध, असा प्रश्न समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उपस्थित केला. तर मलिकांचे जावई समीर खान यांच्याकडे किती किलो ड्रग्ज मिळाले याविषयी कोणी काही का विचारत नाही, असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या.
नवाब मलिक ड्रग्जविषयी बोलत नाही. त्यांना समीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा काय हक्क आहे. मलिक यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात अडकला त्याचा आणि समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम याचा एकमेकांशी काय संबंध आहे, असा प्रश्न क्रांती रेडकर यांनी केला आहे. नवाब मलिकांनी सर्वांना समीर वानखेडेंमध्ये व्यस्त करुन ठेवले आहे त्यामुळे समीर खान विषयी कोणीही प्रश्न विचारत नाही, असा हल्लाबोल क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांवर केला आहे. तसेच आर्यन खान विषयीच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्ही एनसीबीचे अधिकारी नाही. आर्यन खानविषयीचे प्रश्न एनसीबी कार्यालयात जाऊन विचारावेत असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या.
नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते आमच्यावर रोज नवीन आरोप करत नवीन पुरावे सादर करत आहेत ज्यात काहीही तथ्य नाही. नवाब मलिक मीडियासमोर येऊन काही कागदपत्रे दाखवत असतील आणि तुम्ही ते सत्य मानत असाल तर कृपा करुन डोळे उघडा, अशी विनंती यावेळी क्रांती रेडकर यांनी केली. नवाब मलिक मोठे नेते आहेत तर आता आमच्या पाठीशीही एक मोठा नेता आहे. आम्ही त्यांना पुरावे देणार आहोत. त्यामुळे आता समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक हे लवकरच सर्वांसमोर येईल, असे क्रांती रेडकर म्हणाल्या.