मुक्तपीठ

विरोधी पक्षनेत्यांच्या डायरीचं एक पान

- मुकुंद परदेशी

हल्ली डायरी लिहिण्याची सवयच मोडून गेली आहे. तशी त्याला कारणंही अनेक आहेत. पहिलं कारण म्हणजे आता डायरीत लिहिण्यासारखं काही उरलंच नाही. रोज रोज लिहिणार तरी काय ? ‘ आठवडाभरात पडेल, पंधरा दिवसांत पडेल, तीन महिन्यात पडेल, त्याच्या त्याच्या ओझ्याने पडेल, असं रोज रोज कसं लिहिणार ? आणि त्याच्याशिवाय बोलायला , लिहायला आहे तरी काय दुसरं ? आणि डायरी न लिहिण्याचं याच्यापेक्षाही महत्वाचं कारण म्हणजे, सालाबादप्रमाणे यंदाही नवीन वर्षाची डायरी कोणीच भेट म्हणून आणून दिली नाही. पी.ए.ला एकदोनदा सांगून पाहिलं , तो फक्त कसनुसा हसला. शेवटी नाद सोडून दिला. हल्ली जग फार म्हणजे फारच व्यवहारी झालं आहे. बुडाखालची खुर्ची गेली की तुमची किंमतही जाते. एवढा मी घसा कोरडा पडेस्तोवर ओरडतोय , ‘ मी परत येईन. मी परत येईन.’ पण कोणी विश्वास ठेवायलाच तयार नाही. अरे, निदान नवीन वर्षाची एक डायरी भेट देण्यापूरता तरी विश्वास ठेवा म्हणावं. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे , माझी तरी खुर्ची गेल्यावर किंमत गेली ; आमच्या त्या जुन्या मित्राला तर खुर्चीवर असतांनाही किंमत नाही . तीन पायांची कसली आली आहे खुर्ची ? मला तर ती माठ ठेवायची तीन पायांची घडवंचीच वाटते , आणि हा तिच्यावर ठेवलेला माठ ! हा .हा. हा. आज डायरी लिहिण्याचा मुड झाला म्हणून मग कपाटातून एक जुनी डायरी शोधून काढली. तिच्यातलं एक कोरं पान शोधून काढलं आणि त्याच्यावरच्या तारीख, महिना ,सालकडे, गेली पाच वर्षे आमच्या मित्राच्या खिशातल्या राजीनाम्याच्या धमकीकडे जसं दुर्लक्ष केलं होतं, तसं दुर्लक्ष करून लिहायला सुरुवात केली.
नेहमीप्रमाणेच आजही पहाटे चार वाजताच उठलो. ‘त्या’ पहाटेपासून पहाटे लवकर उठायची सवयच लागून गेली आहे. अंघोळीपूर्वी स्वतःच्याच हाताने दाढी घोटून घेतली.आपण अधिवेशनात ‘त्यांची’ बिनपाण्याची हजामत करतो , मग आपल्याच घरात फोम लावून आपलीच दाढी करायला काय हरकत आहे ? हल्ली कोरोनामुळे न्हाव्याला बोलावणं बंद केलं आहे. ते एक सांगायचं कारण झालं , पण खरं म्हणजे खिशालाही परवडत नाही. पूर्वी तो दाढी करून निमूटपणे नमस्कार करून निघून जायचा . हल्ली नमस्कार करणं तर राहिलंच दूर , पैसे मागतो. अंघोळ करून तयार झालो. आधी कपाट उघडून शपथविधीसाठी शिवून ठेवलेल्या ड्रेसवर हळुवारपणे हात फिरवला. मग तोंडावर मास्क , डोक्यावर हेल्मेट घालून स्कुटरवर बसलो आणि थेट ‘वर्षा’ गाठला. लहानपणी गुरुजींनी सांगितलं होतं की, आपलं ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवायचं . त्यांनी सांगितलेलं पाळतोय बरोबर .मास्क आणि हेल्मेटमुळे कोणी ओळखायचा प्रश्नच नव्हता. कोपऱ्यावर उभं राहून दहा मिनिटं ‘वर्षा’ वर त्राटक केलं आणि घरी आलो. घरी आल्यावर ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीनंतर सहाव्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये गुपचूप काढलेल्या ‘सेल्फी’वर दहा मिनिटं त्राटक केलं. गुरुजींनी जे जे सांगितलं आहे ते ते निमुटपणे ऐकावं आणि करावं. ही जी निमुटपणे ऐकण्याची आणि करण्याची सवय आहे ना ती दिल्लीला गेल्यावर फार कामाला येते. तिथे निमुटपणे मान हलवली की इथे रुबाबात फिरता येतं.
आज पंढरपूरच्या जाहीर सभेत बोलतांना एक विचित्र अनुभव आला. ध्यानीमनी नसतांना एकदम समोर भानामतीकर साहेब दिसलेत . शरीराला एक हलकासा झटका बसल्यासारखं वाटलं आणि बघता बघता त्यांची आकृती माझ्या शरीरात विलीन झाल्याचा भास झाला. त्याक्षणी मी माझ्याही नकळतपणे ‘ सरकार केव्हा पडायचं ते माझ्यावर सोडा.’ असं बोलून गेलो आणि परत शरीराला हलकासा झटका बसल्याचा आणि त्यांची आकृती माझ्या शरीरातून बाहेर पडल्याचा भास झाला. बापरे ! माझ्या तोंडून भानामतीकर साहेब तर बोलले नसतील ? जाऊ द्या. कदाचित ‘ अहमदाबाद डिल’मुळे मला तसा भास झाला असावा. दिल्लीला फोन करून हा प्रसंग सांगितला. पलीकडून फक्त गडगडाट करून हसल्याचा आवाज आला. जाऊ द्या. आता शपथविधीचं विझूलायझेशन करत करत झोपावं म्हणतो .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button