मुक्तपीठ

सफलता का नया इतिहास

- भागा वरखडे

भारताची लोकसंख्या जगात दुस-या क्रमांकाची; परंतु ऑलिम्पिकमधील पदक तक्त्यात भारत तळाशी हे चित्र अनेक वर्षे होते. ते आताही बदलले नसले, तरी गेल्या १३ वर्षांपासून भारत ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आता आला आहे. बीजिंग ऑलिम्पिकनंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वाट्याला सुवर्णपदक आले. लंडन ऑलिम्पिकमधील पदाचा विक्रमही भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये मोडला गेला. गेल्या काही वर्षांपूर्वीच नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावू, असे म्हटले होते. त्याची खिल्ली उडवण्यात आली; परंतु अथक परिश्रमाच्या जोरावर नीरजने असाध्य ते साध्य केले. गेल्या आठ महिन्यांपूर्वीच नीरजला छोटासा अपघात झाला. त्यामुळे त्याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येईल, की नाही, याबाबत साशंकता होती. या वेळच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने किती पदे मिळविली, यापेक्षा ती कोणत्या परिस्थितीत मिळवली, हे जास्त महत्वाचे आहे. त्यातही या वेळच्या ऑलिम्पिकमधील पदविजेत्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पदक विजेत्यांत शेतक-यांची मुले जास्त आहेत. काही तर शेतमजुरांची मुले आहेत. बिकट आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत ऑलिम्पिकमधील यश खेचून आणणे जास्त महत्वाचे आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवून नवा इतिहास घडवला आहे. नीरजने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. याचबरोबर, लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रमदेखील मोडीत काढला. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदके जिंकली होती. त्यानंतर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदके जिंकत लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये मीराबाई चानू व रविकुमार दहिया यांना राैप्यपदक, पीव्ही सिंधू, लव्हलिना बोर्गोहेन, बजरंग पुनिया यांना कास्य तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाला कास्य पदक मिळाले. नीरजने तर सुवर्णपदक पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. भारताकडून १२६ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अथेन्समध्ये पार पडली. त्यानंतर चारच वर्षांनी भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण नऊ सुवर्ण, आठ राैप्य, आणि १५ कास्य पदके पटकावली आहेत.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. नंतर दोन फाऊल झाले असले, तरी पहिल्या तीन फे-यांच्या कामगिरीच्या आधारावर त्याने सुवर्णपदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. झेक रिपब्लिकच्या वडलेजने ८६.६७ मीटर, तर वेसेली ८५.४४ मीटर लांब भाला फेकला. भारताची सुरुवात मीराबाई चानूच्या चंदेरी यशाने झाली आणि स्पर्धेचा शेवट नीरजच्या सोनेरी यशाने झाला. नीरज हा सुरुवातीपासूनच भालाफेकीत पदकाचा दावेदार मानला जात होता. त्याने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरवर केलेली भालाफेक ही त्याला सुवर्णपदक जिंकून देणारी ठरली. विशेष म्हणजे नीरज हा पात्रता फेरीतही पहिल्या स्थानासह अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्या वेळी त्याने ८६.६५ मीटरची फेक केली होती. एका शेतकऱ्याचा मुलगा ते ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू हा नीरजचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणा देणारा आहे. विशेष म्हणजे खेळावरचे लक्ष विचलित होऊ नये ,यासाठी नीरज फोनदेखील स्विच ऑफ ठेवायचा. आईसोबत बोलण्यासाठी तो फोन ऑन करायचा. त्यानंतर पुन्हा फोन ऑफ करून सरावाला लागायचा. नीरजच्या कष्टाचे अखेर टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीज झालं. यानंतर नीरजचे एक ट्वीट चर्चेत आले आहे. २०१६ वर्ष नीरजनं गाजवले होते. जागतिक २० वर्षांखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप, दक्षिण आशियाई स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकांची कमाई केली, तर आशियाई ज्युनियर चॅम्पियनशीपमध्ये रौप्य पदक जिंकले. २०१७ मध्ये त्याने एक ट्वीट केले होते. त्यातून नीरजने आपले इरादे स्पष्ट केले होते. ‘जब सफलता की ख्वाहिश आपको सोने ना दे. जब मेहनत के अलावा ओर कुछ अच्छा ना लगे. जब लगातार काम करने के बाद थकावट ना हो. समझ लेना सफलता का नया इतिहास रचने वाला है,’ अशा भावना त्यावेळी नीरजने व्यक्त केल्या होत्या. शनिवारी नीरजने इतिहास रचला आणि अनेकांना त्याच्या चार वर्षांपूर्वीच्या ट्विटची आठवण झाली. स्पर्धेआधी जर्मनीच्या जोहानस वेट्टरला सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते; परंतु अंतिम सामन्यात सगळे फासे उलटे पडले. वेट्टरला अंतिम सामन्याच्या पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. हा तो वेट्टर आहे ज्याने नीरज मला कधीच गाठू शकणार नाही, असे म्हटले होते.

स्पर्धेआधी भालाफेकमध्ये वेट्टरला उसेन बोल्ट समजले जात होते. या वर्षी प्रबळ दावेदार असलेल्या वेट्टरला पत्रकारांनी विचारले होते, की भारताच्या नीरज चोप्राबद्दल काय वाटते? तेव्हा वेट्टर म्हणाला होता, की नीरजचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. त्याला अजून खूप काही शिकायचे आहे. मला तो आव्हान देऊ शकणार नाही. माझ्यापर्यंत पोहोचायला त्याला अजून खूप मेहनत करावी लागेल. सध्या मला चिंता नाही. त्याचे काही आव्हान नाही. एखाद्याला कमकुवत समजून, त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याची किंमत वेट्टरला मोजावी लागली. नीरज किती संयमी आहे आणि ज्याने त्याला क्षुल्लक लेखले, त्याच्या प्रतिक्रियेवर नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतरही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, यावरून यश त्याच्या डोक्यात गेलेले नाही आणि हार-जीत खिलाडूवृत्तीने स्वीकारायची असते, याचा वस्तुपाठ त्याने घालून दिला आहे. त्याचे कारण वेट्टर हा काही दुबळा खेळाडू नाही. गेल्या २४ महिन्यांत ९० मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा जोहानस वेट्टर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. त्याने असा पराक्रम १८ वेळा केला आहे. गेल्या वर्षी विश्वविक्रम करण्यापासून तो ७२ सेंटीमीटर दूर राहिला होता. पोलंडच्या सिलेसियामध्ये त्याने ९७.७६ मीटर अंतर कापले होते. झेक प्रजासत्ताकचा जान जेलेजनी याने ९८.४८ मीटर भाला फेकत विश्वविक्रम केला आहे; पण टोक्योमध्ये वेट्टर काही करू शकला नाही. नीरज चोप्रा एक ॲथेलिट असण्यासोबतच एक फौजी आहे. त्यामुळे तो शिस्तप्रिय आयुष्य जगत असतो. अ‍ॅथलेटिक्स या खेळात सर्वाधिक शारीरिक कस लागतो. फिटनेस, ताकद आणि चपळता या सगळ्याचा सर्वोच्च संगम म्हणजे अ‍ॅथलेटिक्स. या खेळात आतापर्यंत पी टी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, मिल्खा सिंग असे मोजकेच खेळाडू सोडले, तर इतरांनी फारशी मजल मारली नव्हती. या तीनही खेळाडूंचे ऑलिम्पिक पदक एका स्थानाने हुकले. अ‍ॅथलेटिक्समधली ही उणीव नीरज चोप्राने आज भरून काढली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button