नवी दिल्ली : राज्यात पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी आणि पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. दरडी कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथकाला जाग आली आहे. केंद्रीय पथक पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, रायगड आणि सांगली, चिपळूणमधील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आले आहे. उद्या केंद्रीय पथक तब्बल अडीच महिन्यानंतर महाराष्ट्रात येणार असल्यामुळे टीकेची झोड उठली आहे.
राज्यातील घटनेला दोन ते अडीच महिने झाले आहेत. राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे दरड कोसळल्या आहेत. या सगळ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाहणी दौरा करत आहेत. केंद्रीय पथकाचा दौरा खेड, चिपळूणमधील पुरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीमध्ये दुपारी केंद्रीय पथक दाखल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेईल. मिरज तालुका आणि इतर भागातील नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे. परंतु केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर पथक येणार आहे तर पाहणी काय करणार असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
केंद्रीय पथक वेळेवर न आल्याने मदतीस विलंब : राजू शेट्टी
केंद्र सरकार व राज्य सरकार दोघेही शेतकरी विरोधी तर शेतकर्याने जगायचे कसे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तर शेतकऱ्याचे दुर्दैव असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने महापुरामुळे नुसकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुसकसान भरपाई जाहीर केली नाही आणि दोन महिन्यापूर्वी आलेल्या महापुराचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक शिरोळ तालुक्यामध्ये येत आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करत शेतकरी उभा राहतोय. मात्र केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत त्याची थट्टा करत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.