मुंबई : महाराष्ट्रात १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे लसीकरण हे येत्या १ पासून अपेक्षित आहे. या नागरिकांना प्रत्येकी दोन डोस यानुसार १२ कोटी डोसची गरज असेल. राज्यातील सर्व नागरिकांना मोफत द्यायची का याबाबतचा निर्णय एक ते दोन दिवसात होईल. पण मोफत लसीकरणासाठी एकूण ७ हजार ५०० कोटी रूपये राज्य सरकारला मोजावे लागतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे सर्वांनाच मोफत लस द्यायची की फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना ही लस मोफत द्यायची, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी पुरेशा डोसच्या उपलब्धतेबाबत आरोग्यमंत्र्यांनी शंका उपस्थित केली.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी महाराष्ट्रात लसीकरणासाठी कोरोनाविरोधी लसीकरणाचे डोस निर्मिती करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना पत्र लिहिले आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला लिहिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्राला किती डोस मिळू शकतात आणि त्या डोसचे वेळापत्रक कसे असेल अशी विचारणा करणारे पत्र दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले आहे. मात्र या पत्रावर अद्याप दोन्ही कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे टोपे यांनी सांगितले. केंद्राने लसीकरण मोहिमेसाठी लस निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटकडून २० मे पर्यंत लस उपलब्ध नसणार आहे असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे असे टोपे यांनी सांगितले. येत्या १ मे पासून लसीकरण मोहीम मोठ्या लोकसंख्येसाठी सुरू करण्यासाठी सर्वच राज्ये तयार आहेत. पण १ मे रोजी लस उपलब्ध नसेल तर या लसी लोकांना द्यायच्या कशा, असाही सवाल राजेश टोपे यांनी केला.
कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या लसींच्या दराबाबतही केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. सध्या राज्यात १ कोटी ५० लाख २ हजार ४०१ लोकांचे लसीकरण झाले आहे याचे समाधान आहे. पण अद्याप ४५ वयोगटाच्या पुढील लोकांना लस देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दिवसाला साधारणपणे ५.५ लाख लसीचे डोस लागतात. पण सध्या राज्यात उपलब्ध असलेला ८ लाख डोसचा कोटा अवघ्या एक ते दोन दिवसात संपून जाईल असेही टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटाच्या दरम्यान लसीकरणासाठी राज्यातील नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कोविन एपच्या माध्यमातूनच लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळेच सर्वांनी लसीकरण केंद्रावर झुंबड करू नये असे आाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. लस सर्वांना द्यायची आहे, पण अनेक लसीकरण केंद्रावर ही लस उपलब्ध नसते. त्यामुळेच १ मे पासून लसीकरण मोहिमेत लस उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान असेल असे राजेश टोपे यांनी सांगितले.