मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर गेल्या ७ वर्षापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय यंत्रणांचे ओएसडी नियुक्त करावे आणि त्यांचे प्रवक्ते म्हणून किरीट सोमय्या यांना प्रवक्ते करावं असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरुन निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले की, राज्यात गेल्या ७ वर्षांपासून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या ७ वर्षांपासून तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. युपीमध्येही भाजपचा पराभव झाल्यावर सपा नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. मी काही माहिती उघड करत असल्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी नेमले होते. आता केंद्रीय एजन्सीचे ते स्वतः ओएसडी झाले पाहीजे. तसेच किरीट सोमय्या यांना यंत्रणेचे प्रवक्ते केले पाहीजे, अशी टीका ना. @nawabmalikncp मलिक यांनी केली. pic.twitter.com/asszsN86gQ
— NCP (@NCPspeaks) December 20, 2021
माझ्या घरी येण्यासाठी काही लोकं दिल्लीतून आले आहेत. परंतु अद्याप माझ्या घरी आले नाहीत. ते घरी आल्यास त्यांना चहा आणि बिस्कीट देण्यासाठी सांगितले आहे. काही यंत्रणांमधले अधिकारी मला माहिती देतात. यामुळे मी पाहुण्यांसाठी तयारी केली आहे. घरातील लोकांनाही सांगून ठेवलं आहे. त्यांना कारवाई करु द्या आपण त्यांना मदत करु असे नवाब मलिक म्हणाले.
मलिक म्हणाले की, राज्याचे माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी केंद्रीय यंत्रणांचे ओएसडी व्हावे, त्यांना नियुक्तीचा चांगला अनुभव आहे. तसेच किरीट सोमय्या यांना त्यांचे प्रवक्ते करावे असं खोचक ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.