जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत ७ दहशतवादी ठार
श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चमकमकीमध्ये अंसार गजवातुल हिंद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इम्तियाज अहमद शाहासह सात दहशतवाद्यांना ठार करण्यात जम्मू काश्मीर सुरक्षा जवानांना यश आले आहे. शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले तर पुलवामा जिल्ह्यातील त्रल नौबाग भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
काश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी शोपियाँ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी एक मशिदीचा आसरा घेतला. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्यानंतर सुरक्षा दलाचे याठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे.
शोपियाँ जन मोहल्ला भागातील मशिदीला वाचवण्याचे आणि दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावं, यासाठी सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या दहशतवाद्यांनी बाहेर आणण्यासाठी मशिदीत एक स्थानिक इमाम आणि आत उपस्थित असलेल्या एका दहशतवाद्याच्या भावाला पाठवण्यात आलं आहे. हे ऑपरेशन अद्यापही सुरूआहे. दरम्यान शोपियाँ आणि पुलवामा भागात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली.