मुंबई: मुंबईतील ताडदेव परिसरात नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली इमारतीला आज सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. आग नियंत्रणात आली असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मात्र या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. तसेच मुंबईच्या महापौर आणि स्थानिक आमदारांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, सहा वृद्धांना ऑक्सिजनची गरज असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग नियंत्रणात असली तरी धूर प्रचंड होता. सर्व लोकांची सुटका करण्यात आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, कमला इमारतीला सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. कमला इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली होती. सकाळी सुमारास साडेसातच्या सुमारास आग लागली असून आग लेव्हल ३ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.