महिलांच्या नावावर सातबारा ही चांगली संकल्पना : पोलीस उप निरीक्षक रुपाली शिंदे
महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव
नवी मुंबई : आज सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरीही महिलांवरील अत्याचाराचे आणि त्यांना दुय्यम लेखण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. “महिलांच्या नावावर सातबारा” सारख्या संकल्पनेतून महिलांना आर्थिक पाठबळ मिळेल, असे कौतुकोद्गार सानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुपाली शिंदे यांनी काढले. जागतिक महिला दिनानिमित्त जमीन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली शिंदे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या आसमा सय्यद यांचे कौतुक केले व सर्व महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्या म्हणाल्या, प्रशासन, उद्योग, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. आज गुंतवणूक करताना शेअर्स आणि मुदत ठेव यांना प्राधान्य मिळते. जमिनीतील गुंतवणूक पुरुषांच्या नावावर केली जाते. ही गुंतवणूक महिलांच्या नावावर व्हावी यासाठी आसमा सय्यद यांनी अमलात आणलेली संकल्पना अनोखी आहे. “महिलांच्या नावावर सातबारा” या कल्पनेतून महिलांच्या नावावर गुंतवणूक वाढेल आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतील. जमीन व्यवसाय क्षेत्रात यश मिळवल्याबद्दल रुपाली शिंदे यांनी आसमा सय्यद यांचे विशेष अभिनंदन केले.
आसमा सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आपल्या कारकिर्दीचा प्रवास त्यांनी थोडक्यात उपस्थितांसमोर विशद केला. महिलांनी या क्षेत्रात प्रवेश करावा, अभ्यास करून प्रामाणिकपणे यश मिळवावे, ग्राहकांचा विश्वास संपादन करून, आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावे, असा कानमंत्र त्यांनी दिला. उपस्थित महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कंपनीचे डायरेक्टर निलेश पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.