धडकी भरविणारा कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक; राज्यात दिवसभरात ६३,२९४ नवे रुग्ण
मुंबईः राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जलदगतीने पसरत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. राज्यात कधी नव्हे ते गेल्या २४ तासात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.७ टक्के एवढा आहे. आता राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५,६५,५८७ एवढी झालीय. तर राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण ३४,०७,२४५ झालीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे आणि औरंगाबाद, नागपूर यांसारख्या जिल्ह्यांतील परिस्थिती बिघडलीय. अनेक रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी बेडच मिळत नाहीयेत. तर अनेक रुग्णांना रेमडेमीसीव्हर इंजेक्शनची कमतरता भासतेय. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमधल्या स्मशानभूमीत रुग्णांना अग्नी देण्यासाठी रांगा लागण्याचं चित्र निर्माण झालंय.
विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबत निर्णय
मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईतही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ही १२ हजार १७ वर गेली आहे. या ५८ मृतांमध्ये ४२ रुग्ण पुरुष तर १६ महिला रुग्ण आहेत. तसेच, ५८ पैकी ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. गेल्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरे परिसरात ९ हजार ९८९ एवढे रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचे नोंद झाली आहे.
मुंबईत मृत ५८ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. तर , १४ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मात्र एक रुग्ण ४० वर्षाखालील होता. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ५ लाख २० हजार २१४ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ५५४ इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या ४ लाख १४ हजार ६४१ एवढी आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५२ हजार १५९ एवढया चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आजपर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या ४६ लाख १० हजार ७८९ एवढी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारद्वारा कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाण्याची शक्यता आहे.