अर्थ-उद्योगराजकारण

आर्थिक अडचणीतील एसटी महामंडळाला सरकारकडून ६०० कोटींची मदत

एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार

मुंबई : आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाल राज्य शासन ६०० कोटी रुपयांची मदत देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे. तसेच या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री यांचे परब यांनी आभार मानले.

कोरोना महासाथीमुळे राज्यात १५ एप्रिल पासून दुसऱ्यांदा टाळेबंदी लागू करण्यात आली. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त ५० टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी अनिल परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण बुधवारी अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वीदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून तब्बल १ हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला देण्यात आले होते. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. येत्या काही वर्षांमध्ये या वेगवेगळ्या प्रयत्नातून एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी अनिल परब यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button