कोरोना वॉर्डमध्ये भीषण आगीत ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू; इराकमध्ये भीषण दुर्घटना
नसीरिया : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल १८ कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना इराकमध्ये घडली आहे. रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इराकमधील रुग्णालयाच्या कोरोना व्हायरस आयसोलेशन वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत किमान ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत कोरोना वॉर्डमध्ये आग लागल्याची ही दुसरी घटना आहे.
नसीरियाच्या अल-हुसैन रुग्णालयामध्ये भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजन टँकचा विस्फोट झाल्याने आग लागल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिक आरोग्य प्राधिकरणाचे प्रवक्ते हैदर अल-जामिली यांनी मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, ५२ जणांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीमुळे संपूर्ण कोविड वॉर्डचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आगीत होरपळून अनेकांचा मृत्यू झाला आहे. इमारतीमध्ये अजूनही बरेच लोक अडकल्याची भीती आहे. या वॉर्डमध्ये ७० बेड्स होते.
रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण बरेच रुग्ण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांमध्ये दोन आरोग्य कर्मचाऱ्यांही समावेश आहे. नसीरिया आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात शोध मोहीम सुरू आहे, मात्र धुरामुळे वॉर्डमध्ये प्रवेश करणे कठीण झाले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये रुग्णालयातील भीषण आग पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच कोरोना रुग्णाचे नातेवाईक व स्थानिक रहिवासी रुग्णालयाकडे धावले. नसीरियाच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावली आहे.