नाशिकमध्ये बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे ४ व्हेंटिलेटर्स जळून खाक; सुदैवाने अनर्थ टळला
नाशिक : नाशिक महालिकेच्या बिटको रुग्णालयात मंगळवारी संध्याकाळी शॉर्टसर्किट झाले असून यात चार व्हेंटिलेटर्स जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ४ व्हेंटिलेटर्स बंद पडले मात्र वेळीच प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयामध्ये संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने जवळपास चार व्हेंटिलेटर्स जळून खाक झाले. इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे रुग्णांचा जीव वाचला असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नाशिक मनपाच्या बिटको रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्ण उपचार घेत आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने व्हेंटिलेटर्स जळाल्याची माहिती समोर आली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता बिटको रूग्णालयात अचानक शॉर्टसर्किट झाल्याने रुग्णालयातील आयसीयू विभागातील इतरही व्हेंटिलेटर बंद पडले. त्यामुळे परिचारिका, रूग्णांसह नातेवाईकांची मोठी तारांबळ उडाली. या प्रकारानंतर रुग्णांना तातडीने इतर विभागात हलविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी सांगितले.