मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना एनआयएने बुधवारी चौकशीसाठी मुख्यालयात बोलावले होते. त्यानुसार परमबीर सिंग सकाळी ९.३० वाजता एनआयए कार्यालयात हजर झाले. परमबीर सिंग यांची तब्बल ४ तास चौकशी चालली. दुपारी १.१५ च्या सुमारास परमबीर सिंग हे एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांपैकी एक असे एपीआय सचिन वाझे होते. सचिन वाझे यांची गेल्या वर्षी कोरोना काळात नियुक्ती झाल्यानंतर त्यांना सीआययू युनिटमध्ये नेमण्यात आले होते. मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या अहवालामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी भर पडेल असे बोलले जात आहे.
दरम्यान, दुपारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) च्या मुख्यालयात हजर झाले. मनसुख हिरेन हत्येच्या कटात सचिन वाझे यांच्या संपर्कात असल्याचा संशय असल्याने एनआयएने प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले असल्याची चर्चा आहे. त्याआधीच सकाळी मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंग यांनीही एनआयए मुख्यालयात हजेरी लावली. एनआयए पाठोपाठच आता या संपूर्ण प्रकरणात सेंट्रल ब्युरो ऑफ इनवेस्टिगेशन (सीबीआय) ची एंट्री झाली आहे. सीबीआयनेही परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे मासे हाती लागण्याची शक्यता अधिकाधिक यंत्रणांच्या समावेशामुळे निर्माण झाली आहे.
मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी जी बैठक झाली होती, त्यामध्ये एका माजी पोलिस अधिकाऱ्याचा समावेश होता अशी चर्चा होती. त्यामुळे हा माजी पोलिस अधिकारी कोण अशा चर्चेला उधाण आलेले असतानाच एनआयएकडून माजी पोलिस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. प्रदीप शर्मा यांच्या हजेरीने पुन्हा एकदा हा माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आहे का ? अशा मोठ्या चर्चेला उधाण आले आहे.