तेलंगणात सरकारी कर्मचाऱ्यांना ३० टक्के पगारवाढ, निवृत्तीचे वय ६१ !
हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिलपासून 30 टक्के पगारवाढ मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा फायदा तेलगणातील तब्बल 9 लाखाहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. फक्त पगारवाढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना अजून एक भेट दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 58 वरुन 61 करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सकाळी विधानसभेत ही घोषणा केली आहे.
वरिष्ठ IAS अधिकारी सी. आर. बिस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली 2018 मध्ये बनवण्यात आलेल्या 11th Pay Revision Commissionच्या सूचनांवर विधानसभेत चर्चा करण्यात आलं. यापूर्वी तेलंगणा सरकारने 2014 मध्ये Pay Revisionची घोषणा केली होती. 2014 मध्ये तेलंगणा सरकारने सरकारी कर्मचाऱ्याचं वेतन 43 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती. मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळं सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ शक्य झाली नाही. राज्य सरकारचीही आर्थिक स्थिती खालावल्यामुळे या निर्णयाला अजून वेळ लागला. आता परिस्थिती काहीशी सुधारल्यानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळीही यंदा जोरात साजरी होणार आहे. कारण सरकारने त्यांच्यासाठी स्पेशल फेस्टिव्हल अॅडव्हान्स स्कीमची (Special Festival Advance Scheme) घोषणा केलीय. या स्कीममध्ये सरकारने 10 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचारी आता सणावारांसाठी 10 हजार रुपये अॅडव्हान्स घेऊ शकतात. त्यावर कुठलंही व्याज आकारलं जाणार नाही. याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या तारखेपूर्वी या स्कीमचा लाभ घेतला जाऊ शकतो.
तामिळनाडूतही निवृत्तीचं वय 60 वर्षे
तामिळनाडू सरकारने शिक्षक, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांसह आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षे केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात 1 वर्षाने वाढ करुन, ते 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली आहे. पलानीस्वामी यांनी विधानसभेत नियम 110 अंतर्गत ही घोषणा केली आहे.