कर्नाटकात ऑक्सिजनअभावी २४ रुग्णांचा मृत्यू, येडियुरप्पांकडून चौकशीचे आदेश
कर्नाटक : कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. जिल्हा प्रशासानानं रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं मान्य केलंय, मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं नाहीत, तर रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळं झाले, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. विशेष म्हणजे, २४ रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे 60 सिलेंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्यानं हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे की, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीतर इतर आजारांमुळे झाला आहे. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरुन स्पष्ट होतंय की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे २४ लोकांचा जीव गेलाय. संपूर्ण घटनेनंतर ६० ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत.
या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येडियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच प्लान नाहीये, असं म्हणत काँग्रेसनं आरोप केले आहेत.