गलवान खोऱ्यात चीनला नडलेल्या २० शहीद जवानांना वीरता पुरस्कार
नवी दिल्ली : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने १३८० पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये आयटीबीपीच्या २३ जवानांना स्वातंत्र्य दिनी वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये २० जवान हे गेल्या वर्षी चीनच्या सैनिकांना गलवान खोऱ्यात भिडले होते आणि वीरमरण पत्करले होते.
आयटीबीपीने यांची माहिती दिली. लडाखच्या भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते. चीनने अद्याप किती सैनिक मारले गेले याचा आकडा जाहीर केलेला नसला तरीदेखील ४० हून अधिक सैनिक मारले गेल्याचे सांगितले जाते.
आयटीबीपीने सांगितले की सीमेवरील संघर्ष आणि सुरक्षा कर्तव्यांसाठी जवानांना आतापर्यंत दिले गेलेले हे सर्वाधिक वीरता पदक आहेत. दर वर्षी स्वातंत्र्य दिनी देशाची सेवा आणि बलिदानासाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली जाते.
पाण्याचा वेगवान प्रवाह आणि त्यात चीनी सैनिकांनी केलेला पाठीत वार या परिस्थितीतही भारतीय जवानांनी शौर्य गाजवले होते. शस्त्रास्त्रांचा वापर न करता चिनी सैनिकांसोबत या जवानांनी तब्बल १७ ते २० तास लढाई केली. चीनी सैनिकांनी दगड, लोखंडी काटेरी जाळ्या असलेले रॉड आदींनी हल्ला केला होता. रक्तबंबाळ झाले तरही या जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले. या झटापटीत आपले २० जवान शहीद झाले.
यावेळी १३८० पदके दिली जाणार आहेत. यामध्ये वीरतेसाठी राष्ट्रपतींचे २ पोलीस पदक, वीरतेसाठी ६२८ पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी ८८ राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी ६६२ पोलीस पदक देण्यात येणार आहेत. ६२८ पोलीस पदकांपैकी जम्मू-कश्मीर २५६, सीआरपीएफला १५१, आयटीबीपीला २३ वीरता पुरस्कार दिले जाणार आहेत. याशिवाय ओडिशा पोलीस ६७, महाराष्ट्र पोलीस २५ आणि छत्तीसगड पोलिसांना २० पुरस्कार दिले जाणार आहेत.