जालंधर : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना आता पुन्हा एकदा विषाणूनं डोकं वर काढलं आहे. पंजाबमध्ये तर आता कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. लुधियानामधील २ शाळांमध्ये एकून २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा सरकारचा निर्णय अंगलट येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लुधियानाच्या सरकारी सिनिअर सेकंडरी स्कूल बस्ती जोधेवाल शाळेतील आठ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे विद्यार्थी इयत्ता ११ वी आणि १२ वीचे आहेत. यानंतर संबंधित महाविद्यालय आणि शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करुन घेतलं आहे.