Top Newsमुक्तपीठ

योगी सरकारमधील १८ मंत्री राजीनामे देणार; बड्या नेत्याच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

ओबीसी नेत्याचं राजीनामा सत्र, मित्र पक्षांनी दबाव वाढवला

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व विरोधी पक्ष भाजपला घेरण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी मोठी रणनीती आखताना दिसत आहेत. यातच भाजपला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. गेल्या ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांनी पक्षाला रामराम केल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर उत्तर प्रदेशमधील एका बड्या नेत्याने ही तर सुरुवात असून, योगी आदित्यनाथ सरकारमधील १८ मंत्री राजीनामे देणार असल्याचा मोठा दावा केला आहे. या दाव्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाल्याची चर्चा रंगली आहे. ओबीसी नेते व सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी हा दावा केला आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एक-दोन नाही तर, दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत आणि भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे, असे राजभर यांनी नमूद केले आहे.

१४ तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. राज्यपालांकडे राजीनाम्यासाठी लाइन लागणार आहे. २० जानेवारीपर्यंत एकूण १८ मंत्री राजीनामा देतील, असा दावा राजभर यांनी केला आहे. समाजात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी एखादी भूमिका घेतल्यास समाज त्यांच्यामागे उभा राहतो. गेल्या निवडणुकीत ते भाजपसोबत गेले आणि भाजपला समाजाची साथ मिळाली. आता ते जे भूमिका घेतील त्यालाही समाजाची निश्चितच साथ मिळेल. उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे, बसपा बेदखल आहे आणि भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हीच ओळखा, असेही राजभर म्हणाले.

दरम्यान, योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यासोबत त्यांच्या तीन समर्थक आमदारांनीही भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर बुधवारी दारा सिंह चौहान यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे, गेल्या विधानसभा निवडणुकीत राजभर यांनी भाजपसोबत आघाडी केली होती. त्यांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या. राजभर हे जहुराबाद येथून निवडून आले होते. योगी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही दिले गेले होते. मात्र, २०१९ मध्ये राजभर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत भाजपचीही साथ सोडली होती.

मित्र पक्षांचा दबाव

दरम्यान, भाजपमधील ओबीसी समाजाचे नेते पक्ष सोडून जात असल्याने पक्ष नेतृत्वाची चिंता वाढलीय. अशातच भाजपचे सहयोगी पक्ष निषाद पार्टी आणि अपना दल यांनीदेखील दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या आमदारांचं राजीनामासत्र आणि सहकारी पक्षांचं दबावतंत्र यामुळे भाजप समोरील अडचणी वाढल्या आहेत.

निषाद पार्टी आणि अपना दल या दोन्ही पक्षांचा ओबीसी समुदायावर प्रभाव असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत जागावाटपावर मंथन केलं आहे.याबाबत आजतकनं वृत्त दिलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बुधवारी निषाद पार्टी चे अध्यक्ष संजय निषाद आणि अपना दल प्रमुख अनुप्रिया पटेल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपने दोन्ही पक्षांना निवडणुकीच्या काळात सोबत राहण्याचा आवाहन केल्याचं कळतंय. कारण गेल्या दोन दिवसांपासून अपना दल आणि निशांत पार्टीचे नेते देखील समाजवादी पार्टी मध्ये जातील अशी चर्चा होती. यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने सक्रिय होत डॅमेज कंट्रोल करण्याची प्रयत्न केला आहे.

ओबीसी समुदायामधील स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंग चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. याशिवाय अन्य चार आमदारांनी देखील भाजप सोडली आहे. भाजप सोडणाऱ्या नेत्यांनी दलित, मागास, ओबीसी समाजावर अन्याय आणि भेदभाव केल्याचा आरोप योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे. त्यामुळे भाजप २०१७ मध्ये ज्या सोशल इंजिनिअरिंगचा जोरावर विजयी झालं होतं ते सोशल इंजिनिअरिंग कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

अपना दलाची ३६ जागांची मागणी

भाजपचं मित्र पक्ष अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्या निर्णयाकडे देखील मोठा लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजाच्या मोठे नेत्यांनी भाजप सोडल्यानंतर सहयोगी पक्षांनी भाजपवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांनी ३६ जागांची मागणी केलीय. यामध्ये पूर्वांचल मधील काही जागांसह अवध आणि बुदेलंखड आणि कानपूरमधील जागांचा समावेश आहे, २०१७ मध्ये अमित शहा यांनी युतीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अपना दलाला १७ जागांची मागणी केली होती मात्र भाजपने त्यावेळी अकरा जागा दिल्या होत्या. ११ जागांपैकी ९ जागा जिंकत अपना दलाच्या नेत्यांनी स्ट्राईक रेट चांगला असल्याचे देखील दाखवून दिलं होतं. यावेळी अपना दलाच्या नेत्यांची जागांची मागणी वाढवलेली आहे. चोवीस जागांवर अपना दलाची ताकद असल्याचा त्यांचा दावा आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजप सोडल्यानंतर अपना दल एस चे प्रमुख आशिष पटेल यांनी स्वामी प्रसाद मोरे यांनी भाजप आणि एनडीएतून बाहेर जाणं दुःखद आहे. भाजपनं ओबीसी नेत्यांचा आत्मसन्मान लक्षात घ्यायला हवा होता आणि अमित शहा यांना या प्रकरणी लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते. यानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्व सक्रिय झालं आणि त्यांनी निषाद पार्टीचे अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कोर कमिटीच्या बाकी सदस्यामध्ये धर्मेंद्र प्रधान, योगी आदित्यनाथ, सुनील बन्सल यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button