अर्थ-उद्योग

अडचणीतील बँकांच्या ठेवीदारांना १३०० कोटी परत : पंतप्रधान मोदी

बुडीत बँकांना ५ लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन

नवी दिल्ली : अडचणीत सापडलेल्या बँकेत जमा असलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदारांना प्रचंड संघर्ष करावा लागताे. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक ठेवीदारांना अडकलेले १३०० काेटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिली.

विज्ञान भवनात जमा ठेव विमासंबंधित आयाेजित कार्यक्रमात पंतप्रधान माेदी बाेलत हाेते. गेल्या वर्षी जमा ठेव विमा आणि कर्ज हमी सुधारणा विधेयक संसदेने मंजूर केले हाेते. काेणत्याही बँकेवर आरबीआयने प्रतिबंध लावल्यास ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना त्यांच्या ठेवीपैकी ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते. यासंबंधी माहिती देताना पंतप्रधान माेदी म्हणाले, की अनेक दशकांपासून ही समस्या भेडसावत हाेती. ती ज्या पद्धतीने साेडविण्यात आली, त्याचा आजचा दिवस साक्षीदार आहे. वर्षभरात एक लाखाहून अधिक ठेवीदारांना १३०० काेटी रुपयांहून अधिक रक्कम परत मिळाली आहे. यामुळे खातेधारकांचा बँकिंगवरील विश्वास वाढल्याचे माेदी म्हणाले.

बँकांची क्षमता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी छाेट्या बँकांचे सार्वजनिक क्षेत्रातील माेठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात येत असल्याचे माेदी म्हणाले. केवळ बँक खात्यांचीच समस्या नव्हती, तर दुर्गम भागातही बँकिंग सुविधा पाेहाेचविण्यातही अडचण हाेती. मात्र, ग्रामीण भागात पाच किलाेमीटरच्या परिक्षेत्रात बँक शाखा किंवा बँकिंग प्रतिनिधी उपलब्ध असल्याचे माेदी म्हणाले. बँकिंग क्षेत्रातील सुधारणांचा महिलांना लाभ हाेत असल्याचेही माेदींनी सांगितले.

९८ टक्के ठेवीदारांना योजनेचा फायदा

सरकारने ठेवीदारांना मिळणारी विम्याची रक्कम एक लाखावरून पाच लाख रुपये केली आहे. या कक्षेत देशातील विविध बॅंकाचे ९८ टक्के ठेवीदार येतात. बँकांना वाचवायचे असेल तर या ठेवीदारांना संरक्षण देणे आवश्यक आहे. यापूर्वी पैसे मिळण्यासाठी काेणतीही कालमर्यादा नव्हती. आता ९० दिवसांच्या आत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते असल्याचे पंतप्रधान माेदी म्हणाले.

बँकांना सक्षम केले : अर्थमंत्री

बँक ठेवीदारांना सुरक्षितता देणे ही मोदी सरकारने प्राधान्याने केलेली कृती आहे. त्याचप्रमाणे बँकांना सक्षम करण्यासाठीही आम्ही काम करीत आहोत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. मध्यमवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने ठेवींच्या विम्याची रक्कम वाढविली आहे. तसेच गृहकर्जाच्या व्याजाचे दर कमी करण्यात आल्याने मध्यमवर्ग आपले घराचे स्वप्न साकारू शकत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक व्याजाच्या आमिषाने पैसे गुंतविणाऱ्यांना जास्त जोखीम स्वीकारावी लागत असते. त्याचप्रमाणे पैसे बुडण्याचा धोकाही जास्त असतो. त्यामुळे सावधपणे गुंतवणूक करावी, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावेळी बोलताना केले.

बुडीत बँकांना ५ लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन; केंद्रीय मंत्री रुपाला

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी मिळणार आहे. एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्यांना पाच लाखांपर्यंतची रक्कम ९० दिवसांत देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. त्याचा महाराष्ट्रासह देशभरातील बँक खातेदारांना मोठा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्स्य व्यवसाय तथा दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी ठाण्यातील कार्यक्रमात केले.

वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले. ते पुढे म्हणाले, एकेकाळी बँक ही केवळ व्यावसायिक, उद्योजक आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या ठेवी ठेवण्यासाठी म्हणून ओळखली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या जनधन योजनेमुळे तिची ओळख सर्वसामान्यांसाठीही झाली. जनधन योजनेत खाते उघडण्यासाठी लोकांकडे शंभर रुपयेही नाहीत, याची जाणीव झाल्यानंतर शून्य बचत खात्याद्वारेही जनधनचे खाते उघडण्याची परवानगी दिली. या खात्यांत आता ६० हजार कोटी जमा झाले आहेत.

बॅंकिंग क्षेत्रात जनतेचा विश्वास निर्माण होण्याचे काम मोदींच्या या योजनेमुळे झाले. याच धर्तीवर डीबीटीची (डायरेक्ट बेनिफिट) योजना राबविली. दिवाळखोरीत निघालेल्या बँकांतून पूर्वी एक लाखाचे विमा कवच दिले जात हाेते. ते आता वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी परेश शाह यांना एक लाख ३३ हजार आणि विनाेदिनी समेळ यांना पाच लाख रुपये असे दोन धनादेश खातेदारांना देण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या मार्गदर्शनाची चित्रफीतही थेट दाखविण्यात आली.

१०० ग्राहकांचे पैसे खात्यात जमा

ठाणे जिल्ह्यात योजनेचे १८५ लाभार्थी असून त्यांना १ कोटी ६५ लाख दिले जाणार आहेत. यातील १०० ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयानंद भारती यांनी दिली. आपल्याला १ लाख ८० हजार रुपये मिळाले. याचा विशेष आनंद असल्याचे ८४ वर्षीय विनायक जोशी यावेळी म्हणाले. याच योजनेमुळे आईवडिलांसह आपली दीड लाखाची रक्कम बँकेत जमा झाल्याचे अनिता गंधे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button