Top Newsशिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरु; पहिला राऊंड २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार

मुंबई : राज्यात अकरावी प्रवेशासाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द झाल्याने यंदा फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे. त्यानुसार राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. त्यानुसार १४ ऑगस्टला सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात होणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राउंड २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

शासन निर्णय ११ ऑगस्ट अन्वये सदर सामाईक प्रवेश परीक्षा सीईटी रद्द करण्यात आलेली आहे. तसेच रिट याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार राज्यातील इयत्ता अकरावी प्रवेशाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज यासंदर्भात माहिती देताना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही ट्विट केले आहे.

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये परिभाषित पाच ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. सदर पाच ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा १४ ऑगस्ट, २०२१ पासून सुरु करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रम देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापुढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button