पुणे: दहावी (एसएससी) आणि बारावीच्या (एचएससी) विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणं अशक्य असल्यानं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची ऑफलाईन परीक्षांची तयारी सुरु आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर या दहावी बारावीच्या परीक्षासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. तर, बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी १७ नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती आहे. दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे शासन स्तरावरून अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळालेला नाही. ऑफलाईन पद्धतीने ३६ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं बोर्डाकडून नियोजन सुरू असल्याची माहिती आहे.
१७ नंबरचा फॉर्म भरुन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. १२ जानेवारीपर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ :
– दहावी : http://form17.mh-ssc.ac.in
– बारावी : http://form17.mh-hsc.ac.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट असल्याचं सांगितलं आहे.