नवी दिल्ली : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आणि दरडी कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. तसेच पुरपरिस्थितीमुळे रस्त्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. कोकणात रस्ते खचले आहेत, तर नदीवरुन काही पूल देखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे. यासाठी केद्र सरकारकडून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे, वाहून गेलेल्या अथवा खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या कामासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, माहीती गडकरींनी ट्वीट करुन दिली. यात ५२ कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि ४८ कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळचा वशिष्ठी नदीवरचा पूल देखील पावसामुळे खराब झाला होता, त्याची दुरुस्ती लगेच करुन ७२ तासात तो पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच, परशुराम घाट, कारूळ घाट, आंबा घाट, इथे रस्त्यात आलेले अडथळे देखील दूर करण्यात आले आहेत. तात्पुरत्या दुरुस्तीची कामे आधीच हातात घेण्यात आली असून, कायमची दुरुस्ती करण्याचेही काम प्राधान्याने करण्यात येणार आहेत असेही गडकरी यांनी म्हटले आहे
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान
राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूर परिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे १ हजार ८०० कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला होता. प्राथमिक अंदाजानुसार २९० रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते, ४६९ रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती तर १४० पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिली असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.