तामिळनाडूतील लॉकडाऊनमध्ये १ आठवड्याने वाढ
चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यात एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असंही स्पष्ट केलं आहे. तामिळनाडूतील मेडिकल क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हा लॉकडाऊन २४ ते ३१ मे या दरम्यान लागू असणार आहे. या काळात केवळ मेडिकल, पशु चिकिस्ता दुकाने, दूध पुरवठा आणि वृत्तपत्र सेवा सुरु राहतील. आज रविवारी रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहतील. तसेच आज खासगी आणि सरकारी बससेवा सुरु राहतील. स्थानिक प्रशासनाने लोकांना या काळात भाजीपाल्याचा पुरवठा कसा करता येईल याचं नियोजन करावं असाही आदेश मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिला आहे.
महत्वाचं म्हणजे माध्यम सेवा या काळात सुरुच राहतील. तसेच एटीएम आणि पेट्रोल पंपही सुरु राहतील. या काळात अत्यावश्यक सेवांसाठी असलेली वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे. वैद्यकीय कारणासाठी जर कोणाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल तर त्यासाठी ई-पासची आवश्यकता असेल. तसेच वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही असंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच कृषींच्या कामांसाठीची वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवड्याच्या काळात लॉकडाऊनच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करावी असं स्पष्ट आदेश राज्य सरकारच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आले आहेत.