स्पोर्ट्स

भारताच्या कमलप्रीत कौरला थाळीफेकीत पदकाची हुलकावणी!

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कमलप्रीत कौरनं थाळीफेकीच्या अंतिम फेरीत इतिहास घडवला. पात्रता फेरीत ६४ मीटर थाळीफेक करणाऱ्या कमलप्रीतला मात्र अंतिम फेरीत अपयश आलं. तिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

फायनलमध्ये कमलप्रीतसमोर चीनच्या चेन यांगसह जर्मनीच्या तीन खेळाडूंचे कडवे आव्हान होते. चेन हिनं पहिली थाळी फेकून ६२.३१ मीटरचे अंतर पार केले. भारताची कमलप्रीत टॉप १२ मध्ये नवव्या क्रमांकावर थाळी फेकण्यासाठी आली. क्रोएशियाच्या सँड्रा पेरकोव्हिचनं ६२.५३ मीटर थाळी फेक करून आघाडी घेतली. जर्मनीच्या क्रिस्टीन पुडेंझनं ६३.०७ मीटर थाळी फेककरून अव्वल स्थान गाठले. कमलप्रीत कौरनं पहिल्या प्रयत्नात ६१.६२ मीटर लांब थाळी फेकली. पण, क्युबाच्या याईमे पेरेझनं ६५.७२ मीटर लांब थाळी फेकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा धक्का पचण्याआधीच अमेरिकेच्या व्हॅलारी ऑलमननं ६८.९८ मीटर लांब थाळी फेकून पहिल्या फेरीअखेरीस ११ वरून थेट अव्वल स्थानावर झेप घेतली. कमलप्रीत सहाव्या स्थानावर राहिली.

दुसऱ्या प्रयत्नात पोर्तुगालच्या लिलियाना सीएनं कामगिरी उंचावताना ६३.९३ मीटर लांब थाळी फेकली. क्रोएशइयाची सँड्रा आणि इटलीची डेझी ओसाक्यू यांनी फाऊल केला. जर्मनीच्या क्रिस्टीन हिनं दुसऱ्या प्रयत्नात ६५.३४ मीटर थाळीफेक केली. कमलप्रीतनं दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला अन् तिची सातव्या स्थानी घसरण झाली. पहिल्या प्रयत्नात सर्वात लांब थीळी फेकणाऱ्या ऑलमननं दुसऱ्या प्रयत्नात फाऊल केला. पावसामुळे खेळाडूंच्या हातातून थाळी निसटताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे १२ पैकी ७ खेळाडूंकडून फाऊस झाले. पावसामुळे स्पर्धेत व्यत्यय आलेला पाहायला मिळाला. टॉवेल टाकून थाळीफेकसाठीचे वर्तुळ सुकवण्याचा प्रयत्न करावा लागला.

पावसाच्या व्यत्ययानंतर एक तासानं पुन्हा स्पर्धा सुरू झाली. तिसऱ्या प्रयत्नात क्रोएशियाच्या सँड्रानं ६५.०१ मीटर थाळी फेक करून भारताच्या कमलप्रीत कौरला ९व्या स्थानी ढकलले. जर्मनीच्या क्रिस्टीननं ६४.३५ मीटर थाळी फेकली. पण, कमलप्रीतनं ६३.७० थाळी फेकून सहाव्या स्थानी झेप घेतली. पहिल्या तीन प्रयत्नानंतर अव्वल ८ खेळाडूच पुढील तीन प्रयत्नात थाळी फेक करू शकतात. त्यामुळे कमलप्रीतनं एक टप्पा यशस्वीरित्या पार केला.

चौथ्या प्रयत्नात कमलप्रीतकडून फाऊल झाला. चौथ्या प्रयत्नात केवळ तीन खेळाडूंना यशस्वी थाळीफेक करता आली आणि त्यात क्युबाच्या याईमेनं ६५.२० मीटरसह आघाडी घेतली. पाचव्या प्रयत्नात कमलप्रीतनं ६१.३७ मीटर लांब थाळी फेकली, पण तिची ही कामगिरी तिला पदकाच्या शर्यतीतून बाद करणारी ठरत होती. जर्मनीच्या क्रिस्तीननं चौथ्या फेरीत ६६.८६ मीटर थाळी फेक करत दुसरे स्थान पटकावले आणि ही तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ठरली. अखेरच्या प्रयत्नात भारतीय खेळाडूला पदकासाठी ६६ किंवा त्यापेक्षा अधिक मीटर लांब थाळी फेकणे गरजेचे होते. पण, सहाव्या प्रयत्नात तिच्याकडून फाऊल झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button