राजकारण

हे शिवभक्तांचं सरकार; लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध : सुभाष देसाई

मुंबई: राज्य सरकारने शिवजयंतीच्या मिरवणूकीला परवानगी नाकारल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तर, विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपाच्या टीकेनंतर शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. भिवंडीमध्ये शिवजंयती साजरी करण्यात येत नव्हती. तेव्हा शिवसेनेच्या पुढाकाराने ती पुन्हा सुरु करण्यात आली, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी सांगितले. तसेच कोरोना अजून गेलेला नाही. राज्य सरकारने सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेले आहे. शिवजयंतीला विरोध असणं शक्य आहे का, असा सवाल उपस्थित करत हे शिवभक्तांचं सरकार आहे, असंही सुभाष देसाई यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष खबरदारी घेताना नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात. राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे. त्यामुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे.

महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन तख्तावर औरंगजेब बसलाय, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आलंय. आजपर्यंत सरकारमधील मंत्र्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर या सरकारने कधीच आक्षेप घेतला नाही, मात्र शिवजयंती उत्सव साजरा करताना सरकारला कोरोनाची नियमावली आठवते. या मुघल विचारसरणी असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, असं भाजपाने म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button