
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसच्या पर्यायी विरोधक देण्याच्या लढाईत आता राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एन्ट्री झाली आहे. ममता यांनी राहुल गांधींवर नाव न घेता परदेशात जाऊन राहणारे भाजपला हरवू शकणार नाहीत असा टोला हाणला होता. यावर शरद पवारांनीही संमती दर्शविली होती. आता देशात काँग्रेसी नेते ममता यांना लक्ष्य करू लागले आहेत. तर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस एकटी लोकसभेच्या ३०० जागा जिंकू शकत नसल्याचे म्हटले आहे. यावर आता प्रशांत किशोर यांचे वक्तव्य आले आहे. काँग्रेसने गेल्या १० वर्षांत ९० टक्के निवडणुका गमावल्या आहेत. अशा परिस्थितीत विरोधकांचे नेतृत्व करणे हा काँग्रेसचा दैवी अधिकार असू शकत नाही, असे सुनावले आहे.
ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच युपीए आता राहिलीय कुठे? अस्तित्वात नसल्याचे म्हणत काँग्रेसव्यतिरिक्त विरोधकांनी मोट बांधण्याचे उघड उघड संकेत दिल्यानंतर काँग्रेस नेते संतापले आहेत. काहींनी काँग्रेसशिवाय भाजपविरोधात विजय मिळविणे शक्य नाही, असे म्हटले आहे. तर काहींनी ममता सीबीआय, ईडीच्या भीतीमुळे असे बोलत असल्याचे म्हटले आहे. आता प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला आरसाच दाखविला आहे.
काँग्रेस ताकदवान विरोधी पक्षांसाठी ज्या विचाराने आणि विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, ते महत्वाचेआहे. मात्र, विरोधकांचे नेतृत्व करणे हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. काँग्रेस पक्ष गेल्या १० वर्षांत ९० टक्के निवडणुका हरला आहे, यामुळे आता लोकशाही पद्धतीने विरोधी नेतृत्व ठरविण्यास द्यावे, असे प्रशांत किशोर म्हणाले.
ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या; काँग्रेस नेत्याचा पलटवार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर केलेल्या टीकेला आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खर्गे यांनी ममतांवर भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी ममता अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी देशातील प्रत्येक मुद्द्यावर लढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण लढलं, कोण महागाईवर लढलं? प्रियांका गांधी युपीमध्ये लढत आहेत. आजही आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. प्रत्येक मुद्द्यावर आमचा लढा सुरूच आहे. आम्ही लढलो नसतो तर एवढ्या राज्यात आमचे सरकार स्थापन झाले नसते. आमच्याबद्दल असे वक्तव्य योग्य नाही, असेही खर्गे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माझा नेता शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी, महागाईविरोधात लढा देत आहे. जेव्हा तुम्ही लढवय्यांबद्दल अशी टीका करता, तेव्हा त्याचा भाजपला फायदा होतो. मला वाटतं की, ममता ईडी आणि सीबीआयला घाबरुन अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे फक्त भाजपलाच फायदा होणार आहे. मला वाटतं की, भाजपविरोधात लढा द्यायचा असेल, तर अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत.




