स्टर्लिंग अँड विल्सनची इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात एनेल एक्ससोबत भागीदारी
मुंबई : स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड (एसडब्ल्यूपीएल) या शापूरजी पालनजी समूहाच्या कंपनीने तसेच भारतातील आघाडीच्या इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (ईपीसी) कंपनीने आज भारतातील इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात प्रवेशाची घोषणा केली. एसडब्ल्यूपीएलने एनेल एक्स या एनेल ग्रुपच्या उपकंपनीशी एक ५०:५० जॉइंट व्हेंचर केले आहे. एनेल एक्स ही कंपनी आपली नवोन्मेषकारी उत्पादने आणि डिजिटल ऊर्जा सोल्युशन्स यांच्यासाठी ओळखली जाते. भारतीय उपखंडात जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक चार्जिंग संरचनेचा परिचय करून देण्यासाठी तसेच ती निर्माण करण्यासाठी हे जॉइंट व्हेंचर करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी देशभरात चार्जिंग संरचना उभी करण्याच्या कामात जागतिक दर्जाची उत्पादने व सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म पुरवण्याच्या माध्यमातून वेगाने उत्क्रांत होत जाणाऱ्या खासगी ई-मोबिलिटी परिसंस्थेला चालना देणे हे या जॉइंट व्हेंचरचे उद्दिष्ट आहे.
एसडब्ल्यूपीएल आणि एनेल एक्ससाठी हे शाश्वतता व पर्यावरणपूरक भविष्यकाळाच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. यामुळे भारताच्या ई-मोबिलिटी क्षेत्रातील महत्त्वाकांक्षांना मोठी चालना मिळू शकेल. त्याचवेळी एनेल एक्सच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जर्स यामुळे ग्राहकांना उपलब्ध होतील व त्याचा लाभ घेता येईल.
या भागीदारीच्या माध्यमातून एसडब्ल्यूपीएल एनेल एक्सच्या उच्च तंत्रज्ञानाने युक्त, डिजिटल व स्मार्ट डीसींच्या ज्युस समूहाचा तसेच एसी इलेक्ट्रिकल वाहन चार्जर्सचा परिचय करून देणार आहे. जगभरात यापूर्वीच मान्यता प्राप्त करणाऱ्या या उत्पादनांना भारतीयांच्या गरजांनुसार समायोजित करण्यात आले आहे. आपली कार कशी, कुठे आणि कधी चार्ज करायची हे निवडण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. त्यायोगे त्यांना चार्जिंगसाठी सर्वांत कार्यक्षम वेळेची निवड करता येईल आणि कार चार्ज करण्याचा त्यांचा अनुभव पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणात, सुलभ आणि सोयीस्कर ठरेल. हा प्लॅटफॉर्म असेट ऑपरेटर्स आणि मालकांना चार्जिंग स्टेशन्स व नेटवर्क्सच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात मदतही करतो. तसेच प्रणालीत काही समस्या निर्माण झाल्यास तत्काळ (रिअल टाइम) त्याचे निवारण (ट्रबलशूट) करतो.
स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्री. संजय जाधव म्हणाले, “शाश्वततेप्रती आम्ही मानत असलेल्या बांधिलकीचा भाग म्हणून एनेल एक्ससोबत केलेल्या भागीदारीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रात प्रवेशाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. याद्वारे आम्ही भारतभरातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सना एण्ड-टू-एण्ड सेवा पुरवणार आहोत. वेगवान इलेक्ट्रिक चार्जर हा ईव्ही क्षेत्राचा कायापालट करून टाकणार आहे आणि जीवाष्म इंधनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाशी व पर्यायाने होणाऱ्या हवामान बदलाशी लढण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाशी सुसंगत आहे. खासगी व सार्वजनिक वाहतुकीचे वेगाने इलेक्ट्रिफिकेशन करण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन हे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. हे जॉइंट व्हेंचर स्थानिक स्तरावरील उत्पादन आणि चार्जिंग संरचनेच्या सेवांचे ऑपरेशन व देखभाल यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”
एनेल एक्सचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्री. फ्रान्सेस्को व्हेंच्युरिनी म्हणाले, “ही भागीदारी आमच्या ऊर्जा स्थित्यंतर धोरणातील एका महत्त्वाच्या पावलाचे प्रतीक आहे. आम्ही युरोप व उत्तर अमेरिकेसह अनेक जागतिक बाजारपेठांमध्ये इलेक्ट्रिक वाहतुकीच्या प्रसारामध्ये अग्रेसर आहोत. स्टर्लिंग अँड विल्सनसोबत काम करण्याचा अनुभव आमच्यासाठी थरारक आहे. या माध्यमातून आम्ही भारतीय बाजारपेठेतही प्रवेश करत आहोत. शक्तींच्या एकत्रीकरणामुळे आमच्या टीम्सना आमच्या बाजारपेठेबद्दलच्या विस्तृत ज्ञानाचा तसेच तांत्रिक अनुभवाचा लाभ घेणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला प्रभावी निष्पत्ती देण्यात मदत होणार आहे तसेच पर्यावरणपूरक व शाश्वत भविष्यकाळाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. स्थानिक गरजांसाठी अनुकूल, उपलब्ध होण्याजोगी आणि सर्व ड्रायव्हर्ससाठी सोयीस्कर अशी इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्स बाजारात आणून आम्ही या जॉइंट व्हेंचरमधील आमचा वाटा उचलणार आहोत. यामुळे भारतातील व नंतर संपूर्ण आग्नेय आशियातील वाहतूक क्षेत्र कार्बनमुक्त करण्याच्या कामात लक्षणीय योगदान दिले जाणार आहे.”