सांगलीत जयंत पाटलांचा भाजपला धक्का; महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/02/24J_PATIL-780x405.jpg)
सांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का देत आपला झेंडा फडकावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहे.
सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. भाजपकडे असणारी ही महापालिका काँग्रेस राष्ट्रवादी कडे जाणार का याकडे संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पण, अखेर मतदान प्रक्रिया पार पडली आणि राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली.
महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण, आधीच भाजपचे सात नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकाळी ११ वाजता कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मतं पडली तर भाजपच्या धीरज सूर्यवंशी यांना 36 मतं मिळाली. दिग्विजय सूर्यवंशी यांनी धीरज सूर्यवंशी यांचा 3 मतांनी पराभव केला. भाजपची सहा मत फुटली तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले.
सांगली महापालिकेत भाजपकडे 43, काँग्रेस 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक आहेत. तरीही महापौरपदासाठी राष्ट्रवादीचे पारडं जड होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर जयंत पाटलांनी आपल्या होमग्राऊंडमध्ये दमदार खेळी करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव केला.