आरोग्य

सर्वसामान्य कामगारांचे नेते दत्ता ईस्वलकर यांचे निधन

मुंबई : राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, साने गुरुजी स्मारक समितीत काम केलेले, कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचे निधन झाले आहे. आज संध्याकाळी साडेपाच वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते ७२ वर्षांचे होते. दत्ता इस्वलकर हे ३ ते ४ वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने गिरणी कामगारांच्या हक्काचा आवाज हरपला आहे.

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते म्हणून दत्ता इस्वलकर महाराष्ट्राला परिचित होते. मंगळवारपासून (6 एप्रिल) त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज संध्याकाळी 5.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हाडाने गिरणी कामगारांसाठी 2016 मध्ये पनवेलला सोडत (लॉटरी) काढली होती. या सोडतीत घरं मिळालेल्या अनेक कामगारांचे बँकांचे हप्ते सुरु झाले, मात्र तरीही म्हाडाने घरांचा ताबा अद्याप दिलेला नाही. मार्च 2020 मध्ये म्हाडाने बॉम्बे डाईन मिल आणि श्रीनिवास मिल या घरांची सोडत काढली होती. त्या लोकांनाही अद्याप म्हाडाने कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. याविरोधातच कामगारांच्या मागण्या घेऊन 8 एप्रिलला दत्ता इस्वलकरांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार होता.

गिरणी कामगारांच्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी काँग्रेस सरकारने मार्च 2001 मध्ये जीआर काढला. यानुसार मिलच्या जागेवर जो रोजगार उभा राहील तेथे कामगारांच्या एका मुलाला नोकरी देण्याचा निर्णय झाला. मात्र, अद्याप त्यावर अंमलबजावणी होत नव्हती. त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दत्ता ईस्वलकरांनी एका मोर्चाचे आयोजन केले होते. यासाठी ईस्वलकरांच्या मार्गदर्शनाखाली भायखळ्यात गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेचं काम सुरु आहे. याच संस्थेच्या माध्यमातून हा लढा उभा करण्यात आला होता.

गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्थेचे उपाध्यक्ष तेजस कुंभार म्हणाले, दत्ता ईस्वलकरांच्या निधनामुळे भायखळ्याच्या इंडियाना यनायटेड मिल नंबर 2 च्या जागेवर गिरणी कामगारांचं म्युझियम तयार होणार होते. त्या ठिकाणी गिरणी कामगारांना जे रोजगार मिळणार होते त्यासाठी दत्तांनी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून तेथे लढा दिला जाणार होता. त्याची सुरुवात पुढील महिन्यापासून होणार होती. मात्र, त्यांच्या अकाली जाण्याने या लढ्याची ताकद कमी झालीय. तसेच या लढ्याला किती यश येईल हे पाहावं लागणार आहे.

अल्प परिचय

राष्ट्र सेवा दलात घडलेले दत्ता ईस्वलकर हे सुरुवातीला कापड गिरणीत पियोन होते. पुढे त्यांनी कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी 2 ऑक्टोबर 1989 रोजी गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. तेच शेवटच्या श्वासापर्यंत या संघटनेचे अध्यक्ष राहिले. या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी संपूर्ण आयुष्यभर गिरणी कामगारांसाठी काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि लढ्यांमुळे मुंबईतील 10 बंद पडलेल्या कापड गिरणींमधील कामगारांचा लढा उभा राहिला.

1999 पासून दत्ता ईस्वलकर यांनी गिरणी कामगारांच्या हक्काच्या घरांचा लढा सुरु केला. त्यांच्या प्रयत्नातूनच मार्च 2012 मध्ये गिरणी कामगारांच्या घरांची पहिली सोडत (लॉटरी) काढण्यात आली. 1 लाख 75 हजार गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. यापैकी 15-20 हजार कामगारांना त्यांनी आत्तापर्यंत त्यांची हक्काची घरं मिळवून दिली. उर्वरित कामगारांच्या घरांसाठी देखील ते संघर्ष करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button