शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा गळा घोटतात; फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई – दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्या शिवसेनेचे मंत्री शेतकर्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना प्रश्न विचारला आहे.
फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका करताना, शिवसेनेला टार्गेट केलं आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांना त्रास देत असून जाणून बुजून त्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय. फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ऊस उत्पादक शेतकऱ्याचं गाऱ्हाण मांडलं असून शेतकऱ्याला ऊस शेतातच जाळावा लागला, त्यास केवळ शिवसेनेचे मंत्री महोदयच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवास्यात शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्रास दिलाय. आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्यांनी जगायचेच नाही. मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून हा प्रताप चालविलाय, असेही फडणवीस यांनी सांगितलंय. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, ही माफक अपेक्षा आहे. किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका ! असे आवाहनही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ट्विटरच्या माध्यमातून केलंय.