वैधानिक विकास महामंडळ बंद करून विदर्भ, मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात : फडणवीस

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करत विदर्भ आणि मराठवाड्याचे पैसे पळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे. आता तो पैसा थांबवू शकत नाही. पैसा पळवायला सुरुवात झाली आहे. येत्या काळात आणखी पैसा पळवताना दिसेल. याचाच अर्थ सरकारने वैधानिक विकास महामंडळ बंद करुन विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेचा विश्वासघात केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपुरात बोलत होते. तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज बिलाच्या प्रश्नांसह अनेक मुद्यांच्या अनुषंगाने वादळी ठरणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सहकार विभागाने अजित पवार यांना क्लीनचिट दिली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, सहकार विभागाचा अहवाल आला आहे. त्याबद्दल फार माहिती नाही. पण जो अहवाल आला आहे, त्यावर आताच बोलणे योग्य होणार नाही. यामुळे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर बोलणे योग्य राहील.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वीज बिल माफी करायला हवी अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. नाना पाटोले हे सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्याची मजा घेत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. काँग्रेस सत्तेत आहे, सत्तेत राहून असे काही होत नाही. काँग्रेसच्या ऊर्जामंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यायला हवा. आत वेगळे बोलायचे आणि बाहेर वेगळे, असे बोलून सरकार जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.
अॅड असीम सरोदे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी एकनाथ खडसेंना वाचविण्यात तुमचा हात होता आणि तुम्ही सुद्धा गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना याचिकाकर्त्यांनी न्यायालयात तसे पुरावे सादर करावे. न्यायालयाने विचारल्यास त्यावर उत्तर देऊ असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात राजकीय पक्षांचे मेळावे जोरात घेतले जात आहेत. सत्तारूढ पक्षांचे मोर्चेही मोठ्या गर्दीत होत आहेत. मग शिवजयंतीवरच निर्बंध का आणले? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. आम्ही हिंदू म्हणून स्वतंत्र भारतात जगत आहोत. शिवरायांची जयंती आमच्यासाठी प्रेरणा आहे. त्यामुळे जन्मोत्सवावर निर्बंध चुकीचे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली पाहिजे. पण याची आठवण शिवजयंतीवेळीच का, मोठ्या पक्षांच्या मेळाव्याला का होऊ नये हा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. तसेच राज्यातील जनतेची वीज जोडणी कापली जात आहे. रयतेच्या राज्यात मोगलाई आली असल्याची टीका त्यांनी केली.