वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये मारुती सुझुकी साधणार संधी साधली; सीएनजी गाड्यांचा ताफा सज्ज
नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी आता सामान्यांच्या खिशाला आग लावली आहे. लवकरच चालू आठवड्यात साध्या पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर जाणार आहे. या साऱ्या तापलेल्या वातावरणात मारुती सुझुकीने संधी साधली आहे.
पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढत असल्याने लोकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. नवीन गाडी घ्यायची झाली तर डिझेल घ्यायची की पेट्रोल असा प्रश्न पडू लागला आहे. या वाढत्या किंमतींचा फायदा मारुती सुझुकी इंडियाने घ्यायचा ठरविला आहे. मारुतीकडे मोठ्या संख्येने सीएनजी कारचा ताफा आहे, जो अन्य कोणत्याच ब्रँडकडे नाहीय. ह्युंदाईकडे 2 तर फोर्डकडे 1 कार सीएनजीची आहे. बाकी टाटा, निस्सान, रेनॉ सारख्या कंपन्यांकडे एकही सीएनजी कार नाही. याचाच फायदा मारुतीने उठवायची तयारी केली आहे.
मारुतीने येत्या आर्थिक वर्षात विक्रीत 50 टक्के वाढ गृहित धरली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने याची माहिती दिली. मारुतीच्या ताफ्यात असलेल्या 14 पैकी आठ गाड्यांमध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. आता आणखी कार मॉडेलमध्ये सीएनजी देण्यासाठी कंपनी यावर काम करत आहे.
मारुतीचे विक्री आणि वितरणचे सीईओ शशांक श्रीवास्तव यांनी पीटीआयला सांगितले की, यंदा सीएनजी वाहनांची विक्री जवळपास 37 टक्क्यांनी वाढली आहे. जेव्हा एप्रिल -जानेवारीच्या काळात एकूण वाढ ही नकारात्मक म्हणजेच 18 टक्के घटली होती. यामुळे सीएनजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत नाट्यमय रित्या वाढ झाली आहे. यामुळे वाहन चालविण्याचा खर्चदेखील वाढला आहे.