लॉकडाउननंतर प्रथमच नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत वास्तववादी चित्रांचे प्रदर्शन

मुंबई : प्रख्यात चित्रकार गोपाल खेतांची यांच्या “साज श्रृंगार” हया विलोभनीय वास्तववादी चित्रांचे प्रदर्शन मुंबई वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गँलरीत भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. १६ ते २२ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ हया वेळेत रसिकांना पहाता येणार आहे. लॉकडाउननंतर प्रथमच नेहरू सेंटर आर्ट गॅलरी सुरू होत असल्याने हया अनोख्या कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. गोपाल खेतांची राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहेत. ‘साज श्रृंगार” हया चित्र प्रदर्शनात गोपाल खेतांची यांनी भारतीय स्त्री सौंदर्याचा पारंपारिक साज व श्रृंगार, अभिजात सौंदर्याचे वास्तववादी रूप शारीरिक आणि आध्यात्मिक अभिव्यक्तीसह सर्जनशील संवेदनाने दर्शविले आहे. खेतांची यांनी आपल्या चित्रात संगीतातील विविध वाद्य व ते वाजविणारी सौंदर्यवती स्त्री, तिचा साज श्रृंगार, तिची प्रसन्न व विविध भावमुद्रा, तिचा पेहराव तसेच आजूबाजूचा रमणीय परिसर चित्रात दाखवून साज श्रृंगारची नविनतम रचना साकारली आहे. सकारात्मक ऊर्जा व चैतन्य देणारी ही चित्र मालिका रसिकांनी आवर्जून पहावी अशीच आहे.