राजकारण

रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीला भाजपचा विरोध

मुंबई : रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांनी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात वाढ करीत असल्याचे जाहीर केले आहे. परंतु या भाडेवाढीचा पेट्रोल- डिझेलच्या दरातील वाढीशी काहीही संबंध नसून मी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2020 मध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्र्यांनी खटूआ समितीच्या शिफारसी राज्य सरकारने स्वीकारल्या असून भाडेवाढ होणार हे निश्चित असल्याचे सांगितले होते.

त्यामुळे कोरोनाच्या अगोदरच भाडेवाढ करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले होते, त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच आपले ग्राहक कमी होतील त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीला आमचा विरोध असेल असे रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी स्पष्टपणे सांगून सुद्धा ही अन्यायकारक भाडेवाढ करण्यात आली आहे. यातून ओला उबेर सारख्या खाजगी कंपन्यांचे ग्राहक वाढून त्यांनाच मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. याउलट रिक्षा व टॅक्सी चालक यांना कोरोनाच्या काळात आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती परंतु कोरोनाच्या काळात सामान्य मुंबईकरांना एका रुपयांची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने आता सामान्य मुंबईकरांचा शिल्लक असलेला खिसा सुद्धा रिकामा करण्याचा घाट घातला आहे, असा आरोप सुद्धा भातखळकर यांनी केला आहे. ठाकरे सरकारने केलेली भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जनआंदोलन करेल, असा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button