रायगड किल्ल्यावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले

रायगड – शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून डिस्को लायटिंग केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करत या प्रकाराला फटकारलं आहे.
याबाबत अजित पवार म्हणाले की, काही उत्साही लोकांनी रायगडावर लायटिंग केली हा त्यांचा अजाणतेपणा असल्याचं दिसून येतो, पण महाराजांचा वारसा आहे तिथे असं घडणं चुकीचं आहे, काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात, या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य जपलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डिजे लाईट लावणं अतिशय गंभीर आहे अशा शब्दात त्यांनी फटकारलं आहे.
शिवसेनेचे कल्याण येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन रायगडावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई केली, मात्र त्यावरून आता वाद होताना दिसत आहे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.