राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाचा बाऊ : नारायण राणे

कुडाळ : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सहा आठवड्याचे घ्यायचे असते. मात्र, राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करून पळवाट काढत असून अधिवेशन पाच दिवसेच घ्यायला बघत आहे. राज्यात भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली आहे. विकास ठप्प आहे. हे सरकार पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे. या सर्व विषयांना तोंड द्यावे लागणार म्हणूनच सरकार पळवाटा काढत आहे, अशी जोरदार टीका भाजपाचे खासदार नारायणे राणे यांनी केली. ते पडवे येथील त्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सहा आठवड्याचे घ्यायचे असते. परंतु राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करून पाच दिवसाचेच घ्यायला बघत आहे. ही पळवाट आहे. राज्यात सध्या अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना सामोरे जाण्याची हिम्मत त्यांच्यात नाही आणि म्हणूनच आता मंत्र्यांना कोरोना होऊ लागला आहे. हा खरा कोरोना नाही तर राजकीय कोरोना आहे. ९ मार्चला अधिवेशन संपल्यावर हे सर्व मंत्री बरे होणार आहेत, असे नारायण राणे म्हणाले.

कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त म्हणजे ५० हजारांच्या वर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात आहे. आरोग्य यंत्रणा कमकुवत झाली आहे. डॉक्टर नाहीत, साधनसामग्री नाही अशी बिकट अवस्था आहे. त्यामुळे कोरोना वाढण्यास राज्य सरकारच जबाबदार आहे. सिंधुदुर्ग जिल्याचा विकासही ठप्प झाला आहे. लॉकडाऊनमुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली आहे. प्रशासनावर वचक राहिला नाही. पालकमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. म्हणूनच थकीत विजबिलाच्या नोटीस लोकांना येत आहेत. याबाबत भाजप आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले.

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे सरकार
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी ११ क्लिप बाहेर आल्या तरी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई होत नाही. हे सरकार खून, बलात्कारी, गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. यांची जी काही प्रकरणे असतील ती भाजप बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन करायचे म्हणतात, पण त्यांचेच मंत्री ऐकत नाहीत. मंदिरात गर्दी करत आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जात नाही, असेही राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button