आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर बालंट येऊन आता सतरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. परवा या मंत्र्यांनी पोहरादेवी संस्थानवर येऊन जे शक्तीप्रदर्शन करून समाजाची आणि भोळ्या जनतेची सहानुभूती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला त्यात शेकडो लोकांना कोरोनाने आपल्या प्रभावात घेतले असल्याचे आता उघड झाले आहे. खुद्द महंत कबीरदास महाराज आणि त्यांचा परिवार बाधित झाला आहे. आजवर संजय राठोड तोंड लपवत फिरत होते, तोवर बंजारा समाजातून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. मात्र, त्यानंतर राठोड आणि पूजाप्रकरणी समाजाचे मत हळूहळू राठोड यांच्या विरोधात तयार होताना दिसत आहे. खुद्द पूजाची आजी आणि बंजारा समाजातील बुद्धिवंत, काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन त्यांनी वनमंत्र्यांची चौकशी करून पूजाला न्याय मिळावा ही मागणी लावून धरली आहे. वनमंत्री संजय राठोड आणि पूजा प्रकरणात आतापर्यंत एकूण 12 ध्वनी फिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. ज्यांनी संजय राठोड यांना जवळून बघितले आहे अशांना तो आवाज राठोड यांचा की आणखी कुणाचा यावर कुठलाही संशय वाटत नाही, मात्र पोलिस तपासात आजवर या ध्वनी फितींचा विषय आला नाही. मंत्री संजय राठोड ज्या दिवशी पोहरादेवी गडावर दर्शनासाठी आले त्याच दिवशी त्यांचे नि पूजाची जवळीक दर्शवणारी आणखी काही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. आदी काल पूजाच्या लॅपटॉपमधील काही व्हिडिओसुद्धा माध्यमांना मिळाली आहेत. हे सगळे पाहता कुणी शेंबडे पोरही एखाद्या प्राथमिक निर्णयापर्यंत येऊ शकेल, मात्र तपास कामात असणार्या पोलिस चमूकडून अद्यापही काही जाहीर झालेले नाही. एवढेच नव्हे तर बंजारा समाजाची जी लोक या दुर्दैवी घटनेला बळी पडली त्याला सतरा दिवस लोटले तरी पुण्याच्या वानवडी पोलिसात अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा नोंद झालेला नाही.
शिवसेनेच्या अंतर्गत राज्यभर या घटनेने प्रचंड घुसमट आणि चीड व्यक्त केली जात आहे. जिथे कुठे महिलेवर अन्याय, अत्याचार झाला की तुटून पडणार्या शिवसेनेच्या रणरागिणी या घटनेने बेचैन झाल्या आहेत. धरले तर चावते अन् सोडले तर पळते अशी प्रामाणिक शिवसैनिकांची अवस्था झाली आहे. *समाज, जात कुठलीही असो शिवसेनेने आजवर आपला महाराष्ट्र धर्म पाळत बाळासाहेबांच्या जाज्वल्य विचारांचे पालन करीत अन्यायावर तुटून पडण्याची कामे केली आहेत, परंतु याप्रकरणी सगळ्यांच्या तोंडावर बोट आणि हाताची घडी करून बसण्याचे जणू जादेश मिळाल्याचे वातावरण दिसत आहे*.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील म्हणून ओळखले जात असताना एका मुलीच्या प्रकरणात त्यांच्या मंत्र्यांचे नाव आले असताना ते कोणता निर्णय घेतात याकडे राज्याचे नव्हे देशाचे लक्ष लागले आहे. कोरोनाची स्थिती अतिशय कार्यक्षमपणे उद्धवजी हाताळत असताना ऐन कोरोना उद्रेकात त्यांच्याच मंत्र्याने नियमांना पायदळी तुडवून त्यांची मोठी गोची करून टाकली आहे. राठोड हजारो लोकांसाठी कोरोना प्रसारक बनल्याचे लक्षात आल्यावर किमान तत्काळ त्यांच्यावर यासंदर्भात तरी गुन्हे दाखल होण्याची गरज असताना वाशिम पोलिसांनी अज्ञात 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल करून यातले गांभीर्य गमावले आहे.
*भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुण्यात वानवडी पोलिस ठाण्यात भेट देऊन जे अनुभवले त्यावरून तर एका आरोपीत मंत्र्याला वाचविण्यासाठी संपूर्ण पोलिस खाते आणि गृहमंत्रालय कसे कामाला लागले आहे हे उघड झाले*. 17 दिवसात साधा गुन्हाही दाखल झाला नाही, तो करायला आम्हाला वरिष्ठांचे आदेश नाहीत हे सांगून त्या पोलिस अधिकार्याने अप्रत्यक्ष याप्रकरणी असलेला दबाब अधोरेखित केला आहे. सेनेच्या कलंकित मंत्र्याला वाचविण्याच्या कसरतीत आघाडी सरकारची इभ्रत आता पणाला लागली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्त्री सन्मानाला प्राधान्य देऊन राठोड यांचा तत्काळ राजीनामा घ्यायला हवा.