Uncategorized

मुंबई पोलिसांना कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळणार

मुंबई : अखेर मुंबई पोलिसांना कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला आहे. कर्नाटक न्यायालयाने मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी परवानगी दिली. गेली वर्षभर मुंबई पोलीस रवी पुजारीचा ताबा मिळावा याकरता न्यायालयीन लढा देत होते. त्या लढ्याला यश आलं आहे. सोमवारी रवी पुजारीला मुंबई पोलीस कर्नाटकातून घेवून येणार आहेत.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच रवी पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगल येथून त्याला अटक करण्यात आली होती. रवी पुजारी हा अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांच्या लेखी दस्तावेजात याच नावाची नोंद आहे. त्यावेळेस बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट रवी पुजारीकडून जप्त केला होता.

मलेशिया, मोरोक्को आणि थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत सतत रवी पुजारी ठिकाण बदलून राहत होता. एवढंच नाही तर खंडणी उकळून मिळालेल्या पैशांतून रवी पुजारीने ‘नमस्ते इंडिया’ या नावाने अनेक मोठी रेस्टोरंट्स सुरू केली होती.

सेनेगलची राजधानी डकारमधील श्रीमंतांपैकी एक अशी ओळख रवी पुजारीची झाली होती. रवी पुजारीवर सतत भारतीय गुप्तचर यंत्रणांची नजर होतीच. यामुळे वेळ मिळताच सापळा लावून रवी पुजारी याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अँथोनी फर्नांडिस हे नाव बदलून रवी पुजारी गेली 8-10 वर्षे आफ्रिकेतील सेनेगल मधील डकारमध्ये राहत होता. गेल्या वर्षी अटक झाल्यावर फरार झालेला रवी पुजारी पुन्हा आपली संपत्ती आणि परिवाराला घेऊन जाण्यास डकारमध्ये आला होता. पण हा भारतीय गुप्तचर यंत्रणांचा सापळा होता ज्यात रवी पुजारी सहज अडकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button