महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन नाही; दत्तात्रय भरणे यांची घोषणा

पुणे : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे, असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. ते इंदापुरात बोलत होते. महाराष्ट्रात सर्वत्र कोरोना वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू दिवसेंदिवस वाढत आहे. याच कारणास्तव आज राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये तातडीने आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भातल्या उपाय योजना आणि सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
कोरोनाचे संकट संपलेले नाही, कोरोना गेला नाही त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचे दत्ता भरणे यांनी सांगितले. इंदापूर शहर आणि तालुक्यात जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश भरणे यांनी पोलिसांना दिले आहेत. या कारवाईत अनेक जण नाराज होतील, मात्र कोरोना अधिक वाढू नये म्हणून अशी कारवाई करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरा असे आवाहनही यावेळी भरणे यांनी केले.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, मात्र नागरिकांनी लॉकडाऊन होऊ नये यासाठीही सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे यांनी यावेळी नमूद केले. लॉकडाऊनच्या नावाखाली अनेक जण शेतकऱ्यांची पिळवणूक करतात, त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही, पण लोकांनीही कोरोनाची काळजी घेणे आवश्यक असल्याचे भरणे म्हणाले.