महाराष्ट्राच्या शेजारी छत्तीसगड राज्यात पेट्रोल तब्बल 12 रुपयांनी स्वस्त

रायपूर – पेट्रोल-डिझेल दर वाढीने संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. मात्र, असे असतानाच शेजारील काँग्रेसचे सरकार असलेल्या छत्तीसगडमध्ये (पेट्रोल प्रति लिटर 12 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. एवढेच नाही, तर येथे डिझेलचे दरही इतर राज्यांच्या तुलनेत 4 रुपये प्रति लिटरने कमी आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट कमी लागतो. हेच येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असण्याचे कारण आहे. येथे पेट्रोलवर 25 टक्के म्हणजे, 2 रुपये प्रति लिटर व्हॅट लागतो. तर डिझेलवरही 25 टक्के म्हणजे, 1 रुपया प्रति लिटर व्हॅट लागतो. याच मुद्द्यावरून ऑल इंडिया महिला काँग्रेसने ट्विट करत भाजप शासित राज्यांवर निशाणा साधला आहे. केवळ काँग्रेसलाच सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाची परवा आहे, असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी पेट्रोलचा दर 87.28 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 85.66 रुपये प्रति लिटर एवढा होता. महाराष्ट्राशी तुलना करता महाराष्ट्रातील गोंदियात पेट्रोलचा दर 96.07 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 86.31 रुपये प्रति लिटर एवढा आहे.
मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पेट्रोल 99.07 रुपये, तर डिझेल 89.55 रुपये प्रति लिटर आहे. झारखंडमध्येही सिमडेगा येथे पेट्रोलचा दर 87.81 रुपये, तर डिझेल 85.19 रुपये प्रति लिटर आहे. ओडिशातील बारगड येथे पेट्रोल 90.64 रुपये, तर डिझेल 87.34 रुपये प्रति लिटर आहे.