मंगळावर पर्सिव्हरन्स रोव्हरचे यशस्वी लँडिंग; नासाची ऐतिहासिक कामगिरी
वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पाठविलेले ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरचे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे २ वाजून २५ मिनिटांनी हे पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळाच्या भूमीवर उतरले आहे.
पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर उतरताच नासाच्या कॅलिफोर्नियातील जेट प्रपल्सन लॅबोरेटरीमधील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. मंगळावरील प्राचीन जीवसृष्टीचा वेध घेण्यासाठी पर्सिव्हरन्स रोव्हर मंगळावर पाठविण्यात आले आहे. ही मोहीम आतापर्यंतची प्रगत रोबॉटिक एक्सप्लोरर आहे. हे रोव्हर २९.५५ कोटी मैलचे अंतर कापून मंगळावर दाखल झाले आहे.
नासाने आपल्या ट्विटर हँडलवर मंगळावर पोहोचलेल्या रोव्हरचा फोटो शेअर केला आहे. तसेच, या फोटोला सुंदर कॅप्शनही दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, “Hello, world. My first look at my forever home.” याशिवाय, नासाने रोव्हरच्या दुसऱ्या बाजूचा फोटोही शेअर केला आहे. पर्सिव्हरन्स रोव्हरमध्ये २३ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यातून आवाज आणि व्हिडिओ रेकोर्ड करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन मायक्रोफोन्सही लावण्यात आले आहेत. पर्सिव्हरन्स रोव्हरसह दुसऱ्या ग्रहावर जाणारे पहिले हेलिकॉप्टर Ingenuity देखील आहे. पर्सिव्हरन्स रोव्हर दोन वर्षापर्यंत Jezero Crater ला एक्सप्लोर करेल.
पर्सिव्हरन्स हा कमांड सेट आहे. मात्र, पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची टीम त्याला मंगळावर चालण्यास, डोंगराळ भागावर लेझर लाइट मारण्यास, नमुने जमा करण्याआधी मार्गदर्शन करेल. जेजेरो क्रेटर मंगळावरील प्राचीन तलावाचा तळ समजला जातो. मंगळावर कधीतरी जीवसृष्टी असणार. त्याचे संकेत येथील जीवाश्मातून मिळण्याची शक्यता आहे.