
अहमदाबाद : अक्षर पटेलनं दिलेल्या दणक्यानंतर इंग्लंडच्या संघाला रोहित शर्मानं चोपून काढलं. फिरकी गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर तीन जलदगती गोलंदाज खेळवण्याची चूक इंग्लंडला पहिल्याच दिवशी महागात पडल्याचे दिसले. अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळला आणि प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या दिवसअखेर ३ बाद ९९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाचा डाव सावरला.
नाणेफेकीचा कौल बाजूनं लागताच इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, भारतीय फिरकीपटूंनी त्याला हा निर्णय का घेतला, असा विचार करण्यास भाग पाडले. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्मानं इंग्लंडला तिसऱ्याच षटकात धक्का दिला. कर्णधार विराट कोहलीनं खेळपट्टीचा मूड पाहताच लगेच फिरकीपटूंना पाचारण केलं. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अक्षर पटेलनं ३८ धावांत ६ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं २६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली ( ५३) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले.
शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतल्यानंतर रोहितनं कर्णधार विराट कोहलीसह टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. रोहितनं घरच्या मैदानावर ६००० आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या आणि असा पराक्रम करणारा तो ९वा भारतीय फलंदाज ठरला. रोहितनं कसोटीत सलामीवीर म्हणून सहाव्यांदा ५०+ धावा केल्या. विराट कोहलीला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर जीवदान मिळालं. पण, जॅक लिचनं त्याला २७ धावांवर माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला.